Sharad Pawar: शरद पवारांनी राज्यसभा निवडणूक लढवली तर बिनविरोध निवडून येतील, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरे राज्यसभेच्या जागेचा हट्ट सोडणार?
Sharad Pawar: शरद पवारांनी राज्यसभा निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा आहे आज पवार साहेब मुंबई आलेत आम्ही त्यांच्याशी चर्चा करू असं म्हटलं आहे.

मुंबई: राज्यसभेच्या ७ जागांची निवडणूक लवकरच पार पडणार आहे. राज्यसभेच्या आता एकूण 37 जागांची निवडणूक पार पडणार आहे, त्यापैकी 7 जागा या महाराष्ट्राच्या आहेत. विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीचे 6 उमेदवार राज्यसभेवर निवडून जातील. तर एक जागा महाविकास आघाडीला (MVA) मिळणार आहे. या एका जागेवर कुणाला खासदार म्हणून पाठवायचं यावरून महाविकास आघाडीत खलबतं सुरू आहेत. शरद पवार यांनाच पुन्हा एकदा राज्यसभेवर (Rajya Sabha) पाठवावे अशीही काही नेत्यांची इच्छा आहे त्यामुळे त्यांचे नावही चर्चेत आहे. अशातच शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, शरद पवारांनी राज्यसभा निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा आहे आज पवार साहेब मुंबई आलेत आम्ही त्यांच्याशी चर्चा करू असं म्हटलं आहे.
काँग्रेसने जरी विलीनीकरणाचा मुद्दा उपस्थित केला असला तरी आम्ही नेमकं विलीनीकरण झाल्यावरती सत्तेत की सत्तेच्या बाहेर याची भूमिका अजित पवार घेणार होते. त्यामुळे विलीनिकरणचा आणि या निवडणुकीचा मुद्दा फारसा येत नाही. जर भाजपच्या विरोधात लढाईच असेल तर पक्ष संघटन मजबूत करावा लागेल आणि त्यासाठीच हा मुद्दा होता. राज्यसभेसाठी आग्रही नाही म्हणता येणार पण आमची इच्छा आहे. ती मी बैठकीत व्यक्त करून दाखवणार आहे. शरद पवार निवडणूक लढले तर बिनविरोध निवडणूक होईल, असंही शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. तर आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाताताबाबत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे, याबाबत प्रतिक्रिया देताना शशिकांत शिंदे यांनी म्हटलं की, रोहित पवार यांनी जी मागणी केली आहे ती योग्य आहे. चौकशी झाली पाहिजे त्यासाठी गुन्हा दाखल झाला पाहिजे. सरकारच्या विरोधात आमची आंदोलन आणि कडक भुमिका सुरु आहे असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह महाराष्ट्रातील सात राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ पूर्ण होत असून ते निवृत्त होणार आहेत. देशभरात भाजपचे सर्वाधिक 30 खासदार यंदा राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. 2026 हे वर्ष राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरणार असून, या वर्षात देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यसभेतील सदस्यांची निवृत्ती आणि नव्या निवडणुकांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. यंदा राज्यसभेतील एकूण 71 खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. त्यापैकी मार्च महिन्यात 1, एप्रिलमध्ये 37, जूनमध्ये 22 तर नोव्हेंबरमध्ये 11 खासदार निवृत्त होणार आहेत.
Rajya Sabha Election 2026: 73 राज्यसभा जागांसाठी निवडणूक
राज्यसभेच्या एकूण 245 जागांपैकी एप्रिल, जून आणि नोव्हेंबर 2026 या कालावधीत 73 जागांसाठी निवडणूक होणार आहे. निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये केंद्रीय मंत्र्यांसह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. त्यातील सर्वात मोठे नाव म्हणजे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे. त्यांचा कार्यकाळ 25 जून 2026 रोजी संपणार आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हेही त्याच कालावधीत राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत.
Rajya Sabha Election 2026: महाराष्ट्रातून कोण निवृत्त होणार?
महाराष्ट्रातील एकूण सात राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2026 रोजी संपत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सर्वात मोठे नाव आहे. त्यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड आणि खासदार धैर्यशील मोहन पाटील यांचाही समावेश आहे. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या खासदार डॉ. फौजिया खान हे सर्वजण एकाच दिवशी राज्यसभेतून निवृत्त होत आहेत.
























