लातूर विधानसभा मतदारसंघ | जातीय समीकरणाचा यावेळी अमित देशमुखांना फायदा होणार?
जातीय समीकरणे आणि विलासराव देशमुख यांचा वारसा अमित देशमुख यांची यंत्रणा ही काँग्रेसची जमेची बाजू आहे. तर लातूर शहरात भाजपला चेहरा नाही, अशी स्थिती आहे. भाजपाकडे अमित देशमुख यांच्या विरोधात सध्या सक्षम उमेदवारच नाही.
लातूर : लातूर विधानसभा मतदारसंघाचे विभाजन शहर व ग्रामीण अशा दोन मतदारसंघात करण्यात आल्यानंतर लातूर शहराचे मागील दोन टर्मपासून अमित देशमुख हे नेतृत्व करत आहेत. त्यापूर्वी या मतदारसंघात केशवराव सोनवणे व शिवराज पाटील चाकूरकर यांनी प्रत्येकी दोनवेळा आणि विलासराव देशमुख यांनी 1995 वगळता पाच वेळा विधानसभेत लातूरचे प्रतिनिधित्व केले आहे. शिवाजी पाटील कव्हेकर (1995) यांनाही एकदा मतदारांकडून कौल मिळाला होता.
विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीधर्मातून लातूर शहरातील भाजप कमजोर राहिली. त्याचा फायदा गोपीनाथ मुंडे यांनी रेणापूर मतदारसंघात घेतला होता. आजमितीला लातूर महानगरपालिकेची सत्ता भाजपाने खेचून घेतली. जातीय समीकरणामुळे येथून कायम काँग्रेसला लीड मिळाली आहे. मात्र महापालिका आणि लोकसभा निवडणूक पाहता या समीकरणात बदल होत आहे. भाजपचा वाढता जोर आणि काँग्रेसमधील नैराश्येचं वातावरण यामुळे यावेळी बदल घडणार, अशी चर्चा होताना दिसत आहे.
जातीय समीकरणे आणि विलासराव देशमुख यांचा वारसा अमित देशमुख यांची यंत्रणा ही काँग्रेसची जमेची बाजू आहे. त्यातच भाजपचा उमेदवार कोण यावरही बरच अवलंबून आहे. भाजपाकडे अमित देशमुख यांच्या विरोधात सध्या सक्षम उमेदवारच नाही. मात्र पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातूर जिल्ह्यातील आगामी विधानसभा निवडणूक 6-0 अशी जिंकण्याची जंगी तयारी केली आहे. त्यामुळे यंदा अमित देशमुख यांच्याकरिता धोक्याची घंटा वाजत आहे. विलासराव देशमुख यांचा वारसदार या पलीकडे कसलाही प्रभाव अमित देशमुख यांना पाडता आला नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेत सर्वसामान्य लोकांशी नाळ जोडण्यात पंकजा मुंडे जशा यशस्वी झाल्या, तसा मुत्सद्दीपणा अमित देशमुख दाखवू शकले नाहीत.
अमित यांचा गेल्या पाच वर्षातील बहुतांश वेळ मतदारसंघातील हवाहवाई दौरे व परदेश भेटीतच गेला. काँग्रेसमधील अमित देशमुख यांच्या शिवाय कोणीही तगडा नेता नसणे, कार्यकर्त्यांमधील नैराश्य, भाजपाचा वाढता जोर, तरुणांची कमी पाठिंबा याचा फटका काँग्रेसला बसण्याच शक्यता आहे. भाजपने याठिकाणी स्वच्छ व नवा मराठा उमेदवार दिल्यास अमित देशमुख यांची कोंडी होऊ शकते. कारण वंचित बहुजन आघाडी काँग्रेसच्या पारंपारिक मतांवर डल्ला मारणार, हे निश्चित आहे.
लातूर शहरात भाजपला चेहरा नाही, अशी स्थिती आहे. सर्वत्र अनुकूल वातावरण असतानाही लातूर शहरात भाजपाला कॅश करता येत नाही, ही बाब ओळखून पालकमंत्री निलंगेकर यांनी तगड्या व विश्वासार्ह उमेदवाराचा शोध चालवला आहे. ही शोधमोहीम पूर्ण होऊन निलंगेकर यांच्या प्रयत्नास यश आल्यास 1995 ची पुनरावृत्ती होऊ शकते.
गतवेळचे भाजपाचे उमेदवार शैलेश लाहोटी हे यंदाही इच्छुक आहेत. असंख्य कार्यकर्तेही इच्छुक असले तरी विजयाची खात्री कुणीच देऊ शकणारं नाही. दुसरी संधी शक्य असूनही लाहोटी हे पाच वर्ष शांत राहिले. कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे, यंत्रणा तयार करणे, लोकांच्या भेटीगाठी याकडे त्यांनी कायमच दुर्लक्ष केले आहे.
वंचित बहुजन आघाडीचा फायदा-तोटा
मतदारसंघात मुस्लिम आणि दलित यांची संख्या निर्णायक आहे. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसारखी स्थिती लातूर शहरात निर्माण होऊ शकते, अशी येथील परिस्थिती आहे. राष्ट्रवादीतून वंचितमध्ये प्रवेश केलेले राजा मणियार यांच्या रुपाने वंचितचा नवा चेहरा पुढे आला आहे. मणियार यांचे सर्व समाजात असलेले मैत्रपूर्ण संबंध त्यांना तारतील या विश्वासावर त्यांची तयारी सुरु आहे. मात्र वंचितची उमेदवारी कोणाच्या पदरी पडते त्यावर बरेच काही ठरणार आहे.
2014 विधानसभा निवडणूक निकाल
- अमित देशमुख (काँग्रेस) - 1,19,656
- शैलेश लाहोटी (भाजप) - 70,191
- मूर्तजा खान (राष्ट्रवादी) - 4047
- पप्पू कुलकर्णी (शिवसेना) - 2323