नालासोपाऱ्यात 'चोर की पोलीस?' बॅनर्समुळे राजकीय वातावरण तापलं
शिवसेनेत सामील झाल्यानंतर प्रदीप शर्मा यांनाच या मतदारसंघातून तिकीट मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र निवडणुका जाहीर होण्याआधीच चोर की पोलीस? या पोस्टरमुळे नालासोपाऱ्यातील वातावरण तापलं आहे.
![नालासोपाऱ्यात 'चोर की पोलीस?' बॅनर्समुळे राजकीय वातावरण तापलं maharashtra assembly election 2019 chor ki police posters in nalasopara नालासोपाऱ्यात 'चोर की पोलीस?' बॅनर्समुळे राजकीय वातावरण तापलं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/09/16070355/Nalasopara.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नालासोपारा मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागलं आहे. नालासोपाऱ्यात 'चोर की पोलीस?' असं लिहिलेल्या पोस्टरमुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
पोस्टरमधील चोर या शब्द विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर आणि त्यांचा पक्ष बहुजन विकास आघाडी यासाठी वापरण्यात आला आहे. तर पोलीस हा शब्द या मतदारसंघातून इच्छुक असलेले आणि नुकतेच शिवसेनेत सामील झालेले प्रदीप शर्मा यांच्यासाठी वापरण्यात आला आहे. प्रदीप शर्मा यांनी आपल्या पोलीस अधिकारी पदाचा राजीनामा देत शिवबंधन हतात बांधलं आहे.
शिवसेनेत सामील झाल्यानंतर प्रदीप शर्मा यांनाच या मतदारसंघातून तिकीट मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र निवडणुका जाहीर होण्याआधीच चोर की पोलीस? या पोस्टरमुळे नालासोपाऱ्यातील वातावरण तापलं आहे. ज्या एजन्सीने हे बॅनर्स लावले आहेत, त्यांना फोन करुन धमक्या दिल्या जात आहेत. बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकाने ही धमकी दिल्याचं बोललं जात आहे.
गेल्या 30 वर्षांपासूनच्या कुशासन चालवणाऱ्या लोकांचा आता अस्त होणार आहे. परिसरात लागलेले बॅनर्स योग्य आहेत, अशी प्रतिक्रिया प्रदीप शर्मा यांनी दिली आहे.
कोण आहेत प्रदीप शर्मा?
आतापर्यंत शर्मांच्या बंदुकीतून निघालेल्या गोळ्यांनी तब्बल 312 गुन्हेगारांना यमसदनी धाडलं आहे. ज्यात लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांपासून, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी गँगच्या हस्तकांचा समावेश आहे.
प्रदीप शर्मा यांचा जन्म जरी उत्तर प्रदेशात झाला असला तरी त्यांचं शिक्षण महाराष्ट्रातल्या धुळ्यात पूर्ण झालं आहे. एमएससीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रदीप शर्मा 1983 मध्ये पोलीस सेवेत रुजू झाले. मुंबईतल्या माहिम पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक पदावर नियुक्त झालेल्या प्रदीप शर्मांनी अल्पावधीतच वरिष्ठ पोलीस निरीक्षकापर्यंत बढती मिळवली.
शेकडो गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेले प्रदीप शर्मा चकमक फेम अधिकारी म्हणून नावारुपाला आले. कुख्यात गुंडांशी संबंध असल्याच्या संशयावरून प्रदीप शर्मांना ऑगस्ट 2008 मध्ये निलंबीत करण्यात आलं. मात्र सबळ पुराव्याअभावी प्रदीप शर्मांना क्लीनचिट मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा अंगावर खाकी चढवली.
2017 मध्ये पोलीस सेवेत पुन्हा रूजू झाल्यानंतर प्रदीप शर्मा यांनी दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला अटक केली आणि त्यांच्यातला धडाकेबाज अधिकारी जिवंत असल्याची जाणीव करून दिली. त्यांनी विधानसभेच्या तोंडावर प्रदीप शर्मांनी तडकाफडकी राजीनामा दिला.
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)