मोदी बुडतं जहाज, आरएसएसनेही मोदींची साथ सोडली; मायावतींचं टीका
बसपा प्रमुख मायावती यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनवर निशाणा साधला आहे. जनतेच्या वाढत्या विरोधाचा मोदींना सामना करावा लागत आहे, त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे, असं मायावती यांनी म्हटलं.
लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा निशाणा साधला आहे. मोदी सरकार हे बुडतं जहाज असल्याचं या निवडणुकीत दिसत आहे. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही पंतप्रधान नरेंद्र मोदींची साथ सोडली आहे, असा दावा मायावतींनी केला.
लोकसभा निवडणुकीत आरएसएसचे स्वयंसेवक कुठेही दिसत नाहीत. मोदी बुडतं जहाज आहेत, हे आरएसएसच्या लक्षात आलं आहे. तसेच जनतेच्या वाढत्या विरोधाचाही मोदींना सामना करावा लागत आहे, त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे.
निवडणुकीत रोड शो आणि भजन किर्तन करणे सध्या फॅशन बनली आहे. यामध्ये सर्वाधिक पैसा खर्च होतो. निवडणूक आयोगाने या खर्चाचा समावेशही उमेदवाराच्या खर्चात केला पाहिजे, अशी मागणी मायावती यांनी केली.
एखाद्या उमेदवाराने आचारसंहितेचे उल्लंघन केल्यावर निवडणूक आयोगाने प्रचार बंदी घातली तर तो उमेदवार सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहतो किंवा मंदिरात जाऊन प्रार्थना करत असेल आणि माध्यमे त्याचा प्रसार करतात. निवडणूक आयोगाने या प्रकारावर बंदी घातली पाहिजे, अशा मागणी मायावतींनी केली.
गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बसपा प्रमुख मायावती यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. नरेंद्र मोदींनी स्वार्थी राजकारणासाठी पत्नीला सोडलं. जर मोदी राजकीय स्वार्थासाठी आपल्या पत्नीला सोडू शकतात तर देशातील महिलांना काय न्याय देणार, अशी टीका मायावतींनी काल केली होती.