एक्स्प्लोर
Advertisement
Loksabha Election 2019 : लोकशाहीच्या उत्सवावर नागरिकांचा बहिष्कार, 'या' गावांमध्ये मतदानच नाही
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील बार्शी तालुक्यातील वानेवाडी तर लातूर मतदारसंघातील सुनेगाव शेंदरी आणि आनंदवाडीच्या ग्रामस्थांनी प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या गावांमध्ये मतदान प्रक्रियेसाठी गेलेली यंत्रणा ठप्प असून कर्मचारी देखील बसून आहेत.
मुंबई : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 10 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या मतदारसंघाचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
एकीकडे मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना दुसरीकडे मात्र नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातला असल्याचे चित्र आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील बार्शी तालुक्यातील वानेवाडी तर लातूर मतदारसंघातील सुनेगाव शेंदरी आणि आनंदवाडीच्या ग्रामस्थांनी प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या गावांमध्ये मतदान प्रक्रियेसाठी गेलेली यंत्रणा ठप्प असून कर्मचारी देखील बसून आहेत.
वानेवाडीत सुविधांची 'वाणवा , 'उमेदवारा'च्या गावाचा बहिष्कार
उस्मानाबाद मतदारसंघातील बार्शी तालुक्यातील वानेवाडी या गावातील ग्रामस्थांनी मतदान न करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. 1300 लोकसंख्या आणि 800 मतदान असलेल्या या गावच्या ग्रामस्थांनी गावाच्या बाहेर एक फलक झळकावला आहे. त्यामध्ये वाणेवाडी ग्रामस्थांचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार असे लिहिले आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात वानेवाडीच्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो यशस्वीपणे पार पडत आहे. पाणी, रस्ते तसेच गावात स्वातंत्र्यापासून बससेवेपासून वंचित आहे, असे गावकऱ्यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे युवक शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष आणि याच गावचे रहिवाशी शंकर गायकवाड हे देखील उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. मात्र या उमेदवाराला त्याचे आईवडील सुद्धा मतदान करणार नाहीत.
VIDEO | लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्या, नांदेड मतदार संघातील | एबीपी माझा
आनंदवाडीत मतदानाचा 'आनंद' नाही
लातूर मतदारसंघातील लातूर तालुक्यातील आनंदवाडी येथील पीकविमा प्रश्नी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे. या गावात सकाळी सव्वादहा वाजेपर्यंत एकही मतदान झाले नाही. या गावात 1174 मतदान आहे. तहसीलदार अरविंद नरसीकर आनंदवाडी गावात पोहचले असून त्यांनी गावकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आहे.
रस्त्यासाठी सुनेगाव ( शेंद्री ) आक्रमक, मतदानाविना गाव सुने सुने
लातूर मतदार संघातील सुनेगाव (शेंदरी) ग्रामस्थ रस्त्यासाठी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे गावातील सर्व 550 मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावात कोणत्याही पक्षाचा पोलिंग एजंटही मिळालेला नाही. यामुळे मतदानासाठी आलेले कर्मचारी बसून आहेत. गावकरी आक्रमक झाल्याने प्रशासन हतबल झाले आहे.
रस्ता नसल्याने हिंगोलीतील करवाडी ग्रामस्थांचा बहिष्कार
हिंगोली मतदारसंघातील कळमनुरी तालुक्यातील करवाडी गावाला रस्ता नसल्याकारणाने नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातला. 2 वाजले तरीही गावात एकही मतदान झालेले नाही. करवाडी हे गाव शंभर टक्के आदिवासी वस्ती आहे. 300 नागरिक या गावांमध्ये वास्तव्य करतात. गावातील नागरिकांना पुरेशा सुविधा मिळत नसल्यामुळे आणि रस्ता नसल्यामुळे गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. या गावातील नागरिकांना नांदापूर हे मतदान केंद्र आहे. येथील एकही मतदार या मतदान केंद्रावर फिरकले नसल्याचे दिसून आले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
पुणे
Advertisement