Western Maharashtra :पश्चिम महाराष्ट्रात कोण बाजी मारणार? महाविकास आघाडी की महायुती; बारामती कुणाकडे जाणून घ्या, पुण्याच्या पत्रकारांचा अंदाज
Lok Sabha Election : महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे. बारामतीची लोकसभा निवडणूक महत्त्वाची ठरली.
पुणे : महाराष्ट्रात लोकसभेचे 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. यापैकी राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा भाग समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) लोकसभेच्या 10 जागा आहेत. पश्चिम महाराष्ट्रात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला पश्चिम महाराष्ट्रातील 10 विधानसभा मतदारसंघांपैकी 7 जागा मिळाल्या होत्या. तर, राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागा मिळाल्या होत्या. पश्चिम महाराष्ट्रात बारामती, (Baramati Lok Sabha Seat) शिरुर,मावळ,सातारा,माढा, सोलापूर ,हातकणंगले,सांगली, कोल्हापूर, पुणे असे लोकसभेचे 10 मतदारसंघ आहेत. आता महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत होत आहे. यावेळी कोण बाजी मारणार याचा अंदाज पुण्यातील पत्रकारांनी वर्तवला आहे. पुण्यातील पत्रकार पांडुरंग सांडभोर, दिगंबर दराडे, शैलेश काळे आणि राजेंद्र पाटील यांनी अंदाज वर्तवला.
पांडुरंग सांडभोर यांचा अंदाज काय?
पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. 2014 आणि 2019 मध्ये या भागात भाजप आणि शिवसेनेनं यश मिळवलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसला देखील काही जागा मिळाल्या होत्या. भाजपचे इथं 4, शिवसेनेचे 3 आणि राष्ट्रवादीचे 3 खासदार होते. 2024 ला भाजप विरोधात सुप्त लाट दिसली. लोकसभेची निवडणूक असली तरी स्थानिक मुद्ये महत्त्वाचे ठरले आहेत. पुणे मावळ वगळता ग्रामीण मतदारसंघ शेतीचे प्रश्न आहे. 2014 च्या विरोधातील स्थिती आहे. महाविकास आघाडीला 6 ते 7 आणि महायुतीला 3 ते 4 जागा मिळतील, असा अंदाज पांडुरंग सांडभोर यांनी वर्तवला. महायुतीला पुणे, सांगली, सोलापूर या जागांवर विजयाची संधी आहे, असं सांडभोर यांनी म्हटलं. तर, बारामतीची निवडणूक भावनिक झाली. ही निवडणूक पूर्णपणे भावनिकतेवर गेलेली आहे. ही निवडणूक कांटे की टक्कर झालेली आहे. खडकवासला मतदारसंघाची भूमिका निर्णायक राहील, असं सांडभोर म्हणाले. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीचा फॅक्टर महत्त्वाचा ठरणार
दिगंबर दराडे यांचा अंदाज काय सांगतो?
महायुतीला 14-19 प्रमाणं यश मिळणार नाही. यावेळी महायुतीची दमछाक होईल, असा अंदाज दिगंबर दराडे यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत शरद पवारांनी अनुभव पणाला लावला होता. पश्चिम महाराष्ट्रातील 10 जागांमध्ये मविआ आघाडीवर राहू शकते. मविआला 6 तर महायुतीला चार जागा मिळतील, असा अंदाज दराडे यांनी व्यक्त केला. महायुतीला पुणे, बारामती, सांगली आणि सोलापूरला महायुतीला यश मिळेल, असं दिंगबर दराडे म्हणाले.
पाहा व्हिडीओ :
शैलेश काळे काय म्हणाले?
पश्चिम महाराष्ट्र आणि शरद पवार हे नातं 40-50 वर्षांचं आहे. या भागात शिवसेना -राष्ट्रवादी काँग्रेस फुटली याचा भावनिक परिणाम जाणवला. पश्चिम महाराष्ट्र सधन भाग म्हणून ओळखला जातो. इथली लढाई भावनिक पातळीवर लढली गेली. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस एकत्र आले त्याचा मविआला फायदा झाला. तर, अजित पवारांना भाजपला सोबत घेतल्याचा फटका बसल्याचं शैलेश काळे यांनी म्हटलं. महायुतीला पुण्याची जागा मिळेल, असं ते म्हणाले.
पत्रकार राजेंद्र पाटील यांचा अंदाज काय?
पत्रकार राजेंद्र पाटील यांनी महाविकास आघाडीला 5 जागा मिळतील, असं म्हटलं. महायुतीला 4 जागा मिळतील त्यामध्ये पुणे, सातारा, मावळ, सांगली या मतदारसंघांचा समावेश असेल तर बारामतीच्या निकालाचा अंदाज सांगणं अवघड आहे, असं राजेंद्र पाटील म्हणाले.
संबंधित बातम्या :