(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raver Lok Sabha Election Result 2024 : रावेर लोकसभेतून रक्षा खडसेंची हॅटट्रिक, विजयाची नेमकी कारणं काय?
Raver Lok Sabha Election Result 2024 : रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपने आपला गड राखला असून रक्षा खडसे यांनी विजयाची हॅटट्रिक केली आहे. शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांचा पराभव झाला आहे.
Raver Lok Sabha Election Result 2024 : रावेर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं. या मतदारसंघात भाजपने (BJP) आपला गड राखला असून महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी विजयाची हॅटट्रिक केली आहे. रक्षा खडसे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील (Shriram Patil) यांचा दारूण पराभव केला आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान मागील १० वर्षांपासून रावेरमध्ये भाजपचा खासदार आहे, त्यामुळे यंदा येथे काही चमत्कार होणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर या मतदारसंघात भाजपने आपला गड राखला असून महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे या विजयी झाल्या आहे. रावेर लोकसभेत महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी 2 लाख ६२ हजारांच्या मतांनी विजय मिळवला. तर महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना पराभवला सामोरे जावे लागले आहे. रक्षा खडसे यांचा विजय होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी रावेर लोकसभा मतदारसंघात मोठं जल्लोष केल्याचे दिसून आले.
रक्षा खडसेंच्या विजयाची नेमकी कारणं काय?
- दहा वर्षात रक्षा खडसेंनी केलेली विकासकामे.
- एकनाथ खडसे यांचा पाठिंबा.
- रावेर लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला.
- विरोधी उमेदवार नवखे असल्याने फायदा झाला.
- श्रीराम पाटील यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही.
- महिलांचे वाढलेले मतदान, महिला म्हणून फायदेशीर ठरले.
- पाच वर्षात जनतेत मोठा जनसंपर्क.
- शेतकऱ्यांसाठी विमा, रेल्वे सुरू करण्यासाठी केलेले प्रयत्न.
श्रीराम पाटील यांचा ईव्हीएम मशीनबाबत आरोप
दरम्यान, श्रीराम पाटील यांनी रावेर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी थांबवली होती. ईव्हीएम मशीनची बॅटरी 99 टक्के चार्जिंग असल्याचा श्रीराम पाटील यांनी आक्षेप घेतला होता. मतदान झाले होते तर चार्जिंग का संपली नाही. चार्जिंग असलेल्या मशीनमध्ये कमळाला मतदान होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावरून रक्षा खडसे यांनी श्रीराम पाटलांकडे मुद्दे नाही त्यांना कळतंय की रावेरची जागा त्यांच्या हातून जात आहे. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी शोधून ते हरकत घेत आहे, असा पलटवार केला.
इतर महत्वाच्या बातम्या
भाजपच्या दोन्ही हिंदू शेरणींचा पराभव, जनतेनं नाकारलं; हैदराबादमध्ये औवेसी, अमरावतीत वानखेडे विजयी