Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोथरुड विधानसभेत भाजपमध्ये बंडखोरी, चंद्रकांत पाटलांचं टेन्शन वाढलं? अमोल बालवडकर उमेदवारी अर्ज भरणार
Pune News: पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदार संघातून बाणेरचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी बंडखोरी केली आहे. मंगळवारी अर्ज दाखल करणार
पुणे: प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमोल बालवडकर यांच्या घरी जाऊन बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न केला होता. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार आहेत. या जागेसाठी अमोल बालवडकर हे इच्छूक होते. मात्र, त्यांना भाजपकडून (BJP) उमेदवारी देण्यात आली नाही. त्यांची बंडखोरी रोखण्यासाठी भाजपकडून पूर्ण प्रयत्न करण्यात आले. परंतु, हे प्रयत्न अपयशी ठरले.
अमोल बालवडकर यांचे मेहुणे पैलवान अभिजित कटके यांच्या वाघोलीतील घरावर आयकर विभागाने काही दिवसांपूर्वी छापा मारला होता. त्यावेळी त्यांचावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता अमोल बालवडकर हे कोथरुड विधानसभा मतदार संघातून बंडखोरी करणार आहेत.
कोथरुड हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो आणि भाजपसाठी सेफ मतदारसंघ समजला जातो. मात्र आता याच मतदार संघात अमोल बालवडकर यांच्या बंडखोरीमुळे भाजपच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांसमोर मोठं आव्हान उभं राहणार आहे. कोथरुडमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे भाजप कदम चंद्रकांत पाटील, महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे, मनसेचे किशोर शिंदे आणि आता अमोल बालवडकर हे चौघे कोथरुड काबीज करण्यासाठी नशीब आजमावणार आहेत.
राजेंद्र राऊतांचा शिंदे गटात प्रवेश
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या काही जवळच्या साथीदारांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे हेदेखील उपस्थित होते.
ज्योती मेटे आणि माणिकराव शिंदे यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट
शरद पवार गटाच्या नेत्या ज्योती मेटे यांनी आज मनोज जरांगे यांची भेट घेतली. बीड विधानसभेची जागा राष्ट्रवादीकडून संदीप क्षीरसागर यांना जाहीर झाल्याने ज्योती मेटे नाराज असल्याची चर्चा असल्याने या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. तर दुसरीकडे येवल्याचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार माणिकराव शिंदे देखील यावेळी मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवाली दाखल झाले, दोघांमध्ये अर्धा तास बैठक झाली.
आणखी वाचा