(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nanded Vidhan Sabha: मला संपवण्याचं फर्मान दिल्लीहून निघालंय, पण मी संपणार नाही; अशोक चव्हाणांचा राहुल गांधींना अप्रत्यक्ष इशारा
Nanded Vidhan Sabha: मी पक्ष सोडला म्हणून मला संपवण्याचं फर्मान दिल्लीहून निघालं, पण मी संपणार नाही, असा इशारा राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी यांना दिला.
Maha Nanded Vidhan Sabha Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Vidhan Sabha Nivadnuk 2024) पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात (Maharshtra News) विविध पक्षांमध्ये चुरस रंगल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, विविध ठिकाणी पार पडणाऱ्या सभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जडल्या जात आहेत. अशातच नांदेडमधून (Nanded) माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याचप्रमाणे, मी भाजपाच्या (BJP) त्रासाला नाही तर काँग्रेसच्या त्रासाला कंटाळून पक्ष बदलला, असा गौप्यस्फोट देखील अशोक चव्हाण यांनी केला आहे.
मी पक्ष सोडला म्हणून मला संपवण्याचं फर्मान दिल्लीहून निघालं, पण मी संपणार नाही, असा इशारा राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी यांना दिला. भोकरमध्ये आयोजित जाहीर सभेत अशोक चव्हाण बोलत होते. नांदेडला टार्गेट केलं जात आहे. आता तेलंगणाचे सगळे हीरो, हीरोईन येणार आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री काम सोडून इथे येणार आहेत. त्यांचा मुक्काम भोकर राहणार आहे. कारण अशोक चव्हाण यांना संपवायचं आहे. आणि हे फर्मान दिल्लीहून निघाला आहे. आमच्या पक्षातून अशोक चव्हाण गेला, याला संपवा असं फर्मान निघालं आहे. पण मी संपलो नाही आणि संपणार नाही, असं आव्हान अशोक चव्हाण यांनी काँगेस नेतृत्वाला दिलं आहे.
काँगेसच्या त्रासाला कंटाळून पक्ष सोडला : अशोक चव्हाण
मी भाजपाच्या त्रासाला नाही, तर काँगेसच्या त्रासाला कंटाळून पक्ष सोडला, असा गौप्यस्फोट अशोक चव्हाण यांनी केला आहे. भाजपानं ईडीची भीती दाखवली म्हणून अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडला, अशी टीका काँगेसकडून सातत्यानं अशोक चव्हाण यांच्यावर केली जात होती. मात्र, नांदेडमध्ये बोलताना अशोक चव्हाण यांनी जाहीरपणे पक्ष सोडण्याचं कारण जाहीर केलं. शंकरराव चव्हाण यांनाही राजकारणात त्रास झाला , पण त्यांनी कधी बोलून दाखवलं नाही. त्याच त्रासाला कंटाळून शंकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्र समाजातील पक्ष काढला होता, असं अशोक चव्हाण जाहीरपणे म्हणाले. मला पण काँगेसच्या त्रासामुळे हा निर्णय घ्यावा लागला, असं अशोक चव्हाण म्हणाले. षडयंत्र रचणाऱ्या माणसांनी मला कोपऱ्यात नेऊन टाकण्याचा प्रयत्न केला, अशी टीका त्यांनी काँग्रेसच्या राज्य नेतृत्वावर केली आहे.
त्याचप्रमाणे अशोक चव्हाण यांनी बोलताना एका शायरीचादेखील आधार घेतला. अशोक चव्हाण यांनी हिंदीत शायरी केली. झुक झुक कर निखरा खडा हुवा और फिर झूकने का शौक नही. अपने ही हाथो से बचा, अब तुमसे मिटने का गम नही... तुम हलातो की भट्टी मे जब जब मुझको झोकेंगे, तप तपकर सोना बनुगा मै.... असं अशोक चव्हाण म्हणाले.