माझ्या नवऱ्याची एक भानगड काढून दाखवा, मी तुमच्या शंभर भानगडी काढेन; चित्रा वाघ यांचे सतेज पाटलांना आव्हान
मी तुमच्या बायकोवर बोलत नाही. तुम्ही माझ्या नवऱ्याला मध्ये का आणता? असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना केला आहे.
कोल्हापूर: कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे राजकीय वातावरण चांगलंच तापत असल्याचं दिसत आहे. माझ्या नवऱ्याची एक भानगड बाहेर काढून दाखवा, मी तुमचे व्हॉल्यूम काढेन असं जाहीर आव्हान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना दिलं आहे. त्यामुळे राजकारण हे मुद्द्यावरुन आता गुद्द्यावर येत असल्याचं दिसून येतंय.
नाशिकच्या वाघांच्या अनेक भानगडी आहेत असं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी वक्तव्य केल्याचं चित्रा वाघ यांनी सांगितलं. त्यावर वाघांची एक भानगड काढून दाखवा, तुमच्या भानगडींचे व्हॉल्यूम निघतील असं चित्रा वाघ या म्हणाल्या. चित्रा वाघ म्हणाल्या की, निवडणूक आहे, विकासावर बोला. माझ्या नवऱ्याची एकही भानगड काढून दाखवा मी तुमच्या भानगडींचे व्हॉल्यूम काढून दाखवेन. आता बोलणार नाही, वेळ आली तर करुन दाखवेन. मी एक बाई आहे म्हणून दुसऱ्या बाईबद्दल म्हणजे तुमच्या बायकोबद्दल बोलणार नाही.
जेव्हा राजकारणातील मुद्दे संपतात त्यावेळी वैयक्तीक टीका केली जाते असं भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या. पालकमंत्री म्हणता म्हणता बाबा मालकच झाला कोल्हापूरचा असाही टोला चित्रा वाघ यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटलांना लगावला आहे. सत्तेची मग्रुरी ही गुंडांवरती दाखवा, त्या बलात्काऱ्यांवरती दाखवा असंही आव्हान त्यांनी दिलं आहे.
कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीसाठी चित्रा वाघ या भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ आल्या आहेत. दरम्यान, चित्रा वाघ यांचा या आधीच्या सभेमध्ये दगडफेक झाल्याची घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकात जाधव यांचे निधन झाल्यानंतर ही पोटनिवडणूक लागली असून जयश्री जाधव या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्यासाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी या ठिकाणी तळ ठोकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या;
- Kolhapur by Election : 'समोर यायची हिंमत नाही तर सभेत दगड मारता, चित्रा वाघ थेरांना घाबरणारी नाही'
- कोल्हापुरात भाजपच्या माजी खासदाराचं महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य, व्हिडीओ व्हायरल
- Satej Patil : 50 वर्षात काँग्रेसनं काय केलं हे सांगायला बिंदू चौकात यायला तयार, सतेज पाटलांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर