Lok Sabha Election Results Record Margin: लोकसभेतील सर्वाधिक मताधिक्याचे 10 मोठे विजय, काँग्रेस उमेदवार दुसऱ्या स्थानी, पहिल्या स्थानी कोण?
Lok Sabha Election Results : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दिग्गजांऐवजी फारशा चर्चेत नसलेल्या उमेदवारांनी चांगले मताधिक्य मिळवले. या उमेदवारांच्या यादीवर एक नजर..
Lok Sabha Election Results : लोकसभा निवडणुकीत भाजपने (BJP) सर्वाधिक जागा मिळवल्या. भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीए आघाडीला (NDA) बहुमत मिळाले असले तरी भाजपला स्वबळावर बहुमत गाठता आले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दिग्गजांऐवजी फारशा चर्चेत नसलेल्या उमेदवारांनी चांगले मताधिक्य मिळवले.
भाजपसह काँग्रेसच्या उमेदवारांनी चांगले मताधिक्य मिळवले. देशात सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या विजयी उमेदवारांची यादी...
> शंकर लालवाणी (भारतीय जनता पार्टी)
भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील इंदूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यमान खासदार यांनी तब्बल 10 लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला. लालवाणी यांनी 10 लाख 8 हजार 77 मतांनी विजय मिळवला. या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराने नाट्यमयरीत्या माघार घेतली होती. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता.
रकीबुल हुसैन (काँग्रेस)
काँग्रेसचे उमेदवार रकीबुल हुसैन यांनी आसामच्या धुबरी मतदारसंघातही 10 लाखांहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला. हुसैन यांनी ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे उमेदवार मोहम्मद बदरुद्दीन अजमल यांचा 10 लाख 12 हजार 476 मतांनी विजय मिळवला.
शिवराज सिंह चौहान (भाजप)
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे विदिशा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. 8 लाख 21 हजार 408 मतांच्या फरकाने शिवराज सिंह चौहान विजयी झाले.
सीआर पाटील (भाजप)
भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अर्थात सीआर पाटील यांनी नवसारी मतदारसंघात 7 लाख 73 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला. सीआर पाटील हे या ठिकाणी चार वेळा विजयी झाले आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा 6 लाख 89 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.
अमित शाह (भाजप)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून 7 लाख 44 हजार 716 इतक्या मताधिक्याने विजयी झाले. अमित शाह यांना 10 लाख 10 हजार 972 मते मिळाली. दुसऱ्या स्थानावर काँग्रेसच्या सोनल पटेल होत्या.
अभिषेक बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस)
तृणमूल काँग्रेसचे उमेदवार अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपच्या उमेदवाराचा 7 लाख 10 हजार 930 मतांच्या अंतराने पराभव केला.
इतर काही उमेदवारांचे मताधिक्य...
छत्तीसगडमधील रायपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे बृजमोहन अग्रवाल यांना 10,50,351 मते मिळाली. त्यांनी काँग्रेसच्या विकास उपाध्याय यांचा 5 लाख 75 हजार 285 मतांनी पराभव केला.
वडोदरामधून भाजपचे हेमांग जोशी 5 लाख 82 हजार 126 मतांनी विजयी झाले. तर गौतम बुद्ध नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे महेश शर्मा हे 5 लाख 59 हजार 472 मतांनी विजयी झाले. मध्य प्रदेशातील गुना येथून भाजपचे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसचे यादवेंद्र राव देशराज सिंह यांचा 5 लाख 40 हजार 929 मतांनी पराभव केला. गुजरातमधील पंचमहाल लोकसभा मतदारसंघातून भाजपचे राजपाल सिंह महेंद्र सिंह यांनी काँग्रेस नेते गुलाबसिंग सोमसिंह चौहान यांचा पाच लाखांहून अधिक मतांनी पराभव केला.
काँग्रेस नेते राहुल गांधीचाही मोठा विजय
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीदेखील वायनाड आणि रायबरेली मतदारसंघातून मोठा विजय मिळवला. राहुल गांधी यांना रायबरेलीत 3 लाख 90 हजारांचे मताधिक्य मिळाले. तर, वायनाडमधून त्यांनी 3 लाख 64 हजारांचे मताधिक्य मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 1 लाख 50 हजारांच्या मताधिक्याने विजय झालेा.