एक्स्प्लोर
Advertisement
खामगाव विधानसभा मतदारसंघ : तिरंगी लढतीची शक्यता, वंचित बहुजन आघाडी डार्क हॉर्स ठरणार का?
सुरत-नागपूर महामार्गावरील खामगाव हे एक महत्वाचं शहर, कधीकाळी या शहराची ओळख रजतनगरी म्हणून होती. हळूहळू ती मागे पडली. त्यानंतर दिलीप सानंदा यांनी खामगाववर वर्चस्व प्रस्थापित केलं. दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर हे खामगावचेच. त्यांचे चिरंजीव आकाश फुंडकर हे विद्यमान आमदार. खामगावमध्ये आता तिरंगी लढत अपेक्षित आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खामगावमध्ये घेतलेल्या प्रचार सभेत, खामगाव जिल्हा झाला का? खामगाव - जालना रेल्वे महामार्ग झाला का? जिगावाचे काय झाले.. मुख्यमंत्री आले गेले.. अशी मराठीतली तीन वाक्य बोलून भावनिक साद घालत बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगावच्या लोकांची मन जिंकली. पंतप्रधान मोदींच्या भावनिक आवाहनाला साद देत मतदारांनी काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपच्या आकाश फुंडकर यांच्या स्वाधीन केला. मात्र, या निवडणुकीत भारीपची मोठी भूमिका निर्णायक राहिली. यंदाही युती-आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशी चुरशीची तिरंगी लढत होणार का? वंचित बहुजन आघाडीची भूमिका परिणामकारक ठरणार का? तर यावेळची निवडणूक ही स्थानिक नेत्यांसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे.
खामगाव विधानसभा मतदारसंघात सध्या पांडुरंग फुंडकर यांचे चिरंजीव आकाश फुंडकर हे आमदार असून त्यांनी 2014 मध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून आमदार असलेले दिलीप सानंदा यांचा 7061 मतांनी पराभव केला. त्यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली. मात्र, राष्ट्रवादी आणि शिवसेना उमेदवाराला अत्यल्प मते मिळाली त्यामुळे या मतदारसंघात खऱ्या अर्थाने भाजपा - काँग्रेस आणि भारिप बहुजन महासंघ अशीच तिहेरी लढत पाहायला मिळाली होती.
लोकसभा निवडणुकीत खामगाव विधानसभा मतदारसंघात मिळालेली मते.
खासदार प्रतापराव जाधव यांना 88 हजार 252 मते (शिवसेना).
डॉ. राजेंद्र शिंगणे यांना 54 हजार 973 मते(राष्ट्रवादी).
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा 2014 निवडणुकीचा निकाल
1) आकाश फुंडकर - 71 हजार 819 (भाजप)
2) दिलीप कुमार सानंदा - 64 हजार 758 (काँग्रेस)
3) अशोक सोनोने - 47 हजार 541 (भारिप)
माजी आमदार दिलीप सानंदा यांच्यासह काँग्रेसकडून धनंजय देशमुख, तेजेंद्र सिंह चव्हाण, शेख जुलकर नैन शेख चांद यांनी देखील काँग्रेसकडे उमेदवारीची पक्षाकडे मागणी केली आहे मात्र, दिलीप सानंदा यांनी पक्षासाठी केलेले काम आणि मतदार संघातील त्यांचा जनसंपर्क याची दखल घेत पक्षाकडून सानंदा यांनाच पसंती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार आकाश फुंडकर हे दावेदार आहेत. पुन्हा आकाश फुंडकरच निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित आहे. वंचित बहुजन आघाडीकडून गणेश चौकसे, अशोक सोनोने, पंजाबराव देशमुख यांनी आपल्या पक्षाकडे उमेदवारीसाठी दावा केला आहे.
अशोक सोनोने यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीने प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याने या मतदारसंघात सामाजिक समीकरण जुळवण्यासाठी नवीन चेहरा मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तर दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव आमदार आकाश फुंडकर यांच्याविषयी मतदारसंघात भावनिक लाट असल्याचंही जाणकारांचं मत आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील अन्य मतदारसंघाचं निवडणूक पूर्व विश्लेषण
खामगावची एक ओळख उद्योग नगरी म्हणून असली तरी ओळखलं जातं मात्र पाहिजे त्या प्रमाणात मोठे उद्योग खामगावला आले नाहीत. कधी काळी खामगाव परिसर हा कॉटन बेल्ट म्हणून ओळखला जायचा परंतु, अलीकडे कपाशीचा पेरा कमी झाला आहे. शेतकरी हल्ली सोयाबीनला पसंती देत आहेत. त्यानुसार सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभे राहणे आवश्यक होते. मोठे उद्योग उभे राहण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख घटकांमध्ये दळणवळण, कुशल कारागीर, कच्चा माल, मुबलक पाणी या सुविधा खामगाव तालुक्यात आहेत. तरी आजवर एकाही लोकप्रतिनिधीने मोठे उद्योग शहरात यावेत म्हणून फारसे प्रयत्न केले नाहीत. यामुळे खामगावातील कुशल कामगार मोठ्या शहराकडे धाव घेत आहे. खामगाव हे रजतनगरी म्हणूनही ओळखलं जात होतं. महाराष्ट्रात चांदीच्या दागिन्यांवर कलाकुसर करणारं शहर म्हणून खामगावची ख्याती होती, मात्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे खामगावातला कारागीर वर्ग मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित झाला. यामुळे एकेकाळी चांदीची मोठी बाजारपेठ असलेल्या या उद्योगावर अवकळा आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खामगावच्या प्रचारसभेत मराठीतून खामगावकरांना साद घालताना जे प्रश्न विचारले होते, त्यांचीही उत्तरे पाच वर्षांनंतर नकारार्थीच आहेत. पण मतदारसंघात त्याची फारशी चर्चा होत नाही. फक्त जिगावा प्रकल्पासाठी काही निदी मंजूर झाल्याचं सांगितलं जातं. मात्र खामगाव-जालना रेल्वे किंवा खामगाव जिल्हा याविषयीही मात्र काहीही हालचाल दिसत नाही.
खामगाव शहरामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी दिवंगत पांडुरंग फुंडकर यांचे स्वप्न असलेले टेक्स्टाईल पार्क अजूनही प्रत्यक्षात उतरलेलं नाही. या निवडणुकीत देखील हा मुद्दा अग्रस्थानी राहणार आहे. भाजपा सरकारने देशासह राज्यात केलेल्या विकास कामांच्या जोरावर पुन्हा एकदा भाजपा उमेदवार जनतेसमोर मते मागण्यासाठी जाणार असून विजयाचा दावा देखील केला जात आहे. तर सरकारने जीएसटी नोट बंदीसारखे निर्णय घेऊन जनतेची एकप्रकारे दिशाभूल केली असा आरोप केला जात आहे. खामगावातील मतदार पुन्हा एकदा काँग्रेस उमेदवाराला पसंती देईल, असा दावाही काँग्रेसकडून केला जातोय, गेल्या निवडणुकीमध्ये भाजपाचे नियोजन यशस्वी ठरले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्याचबरोबर भारिप बहुजन महासंघ यांच्यात झालेले मतांचे विभाजन याचा फायदा भाजपला झाला. यावेळी देखील वंचित स्वतंत्र लढल्यास विभाजित मते ही भाजपच्याच पथ्यावर पडेल असंच चित्र दिसत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement