D.K Shivakumar: कर्नाटक काँग्रेसचे 'संकटमोचक' डीके शिवकुमारांनी विलासरावांचे सरकार अन् अहमद पटेलांची खासदारकी सुद्धा वाचवली होती!
शिवकुमार यांचे कौशल्याचे, राजकीय व्यवस्थापन तसेच संकटमोचक म्हणून असलेली प्रतिमा कर्नाटक निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध झाली आहे. कर्नाटक काँग्रेसमधील ते शक्तीशाली नेते समजले जातात.
D.K Shivakumar: अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा अक्षरश: सुपडासाफ करत सत्तांतर केले आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेससाठी स्थानिक पातळीवर रणनीती राबविण्यात सर्वात मोठा हात होता तो विद्यमान कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आता मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार असलेले डी. के. शिवकुमार. त्यांच्यासह राज्यातील नेत्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ आज कर्नाटक निकालामध्ये दिसून आलं आहे. शिवकुमार यांचे कौशल्याचे, राजकीय व्यवस्थापन तसेच संकटमोचक म्हणून असलेली प्रतिमा कर्नाटक निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध झाली आहे. कर्नाटक काँग्रेसमधील ते शक्तीशाली नेते असून अत्यंत श्रीमंत राजकारणी सुद्धा समजले जातात. पक्ष जेव्हा जेव्हा संकटात असेल तेव्हा तेव्हा त्यांनी धावत जात संकटाचा सामना अगदी नेटाने केला आहे.
विलासरावांचे सरकार वाचवले
स्वर्गीय विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रिपदाच्या काळात 2002 मध्ये अविश्वास प्रस्तावाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी देशमुखांनी डी. के. शिवकुमार यांच्याच संपर्कात होते. तेव्हा डी.के. शिवकुमार यांनी मतदानाच्या तारखेपर्यंत एक आठवडा महाराष्ट्रातील आमदारांना बंगळुरू बाहेरील भागात असलेल्या त्यांच्या रिसॉर्टमध्ये ठेवले होते. त्यामुळे देशमुखांचे सरकार वाचले होते.
अहमद पटेलांची खासदारकी वाचवली
विलासरावांचे सरकार वाचवल्यानंतर 2017 मध्ये राज्यसभा निवडणुकीत डीके शिवकुमार यांनी काँग्रेस नेतृत्वाला मदत करत 42 गुजरात काँग्रेस आमदारांना बंगळूरमधील त्यांच्या रिसॉर्टमध्ये हलवण्यास मदत केली होती. जेणेकरून भाजपकडून घोडेबाजार होऊ नये यासाठी काळजी घेतली होती. त्यामुळे अहमद पटेल यांना निवडणूक जिंकण्यास मदत झाली. 2018 च्या निवडणुकीनंतर कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांच्या आघाडी सरकारच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याचे श्रेय त्यांनाच जाते. ते पक्षाचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचेही जवळचे विश्वासू आहेत. शिवकुमार हे भारतातील सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी एक आहेत. 2018 च्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करताना त्यांनी 840 कोटींची एकूण संपत्ती जाहीर केलीहोती. 2 जुलै 2020 रोजी डी.के. शिवकुमार यांनी अधिकृतपणे दिनेश गुंडू राव यांच्यानंतर कर्नाटक प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.
आठव्यांदा आमदार
डीके शिवकुमार त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ असलेल्या कनकपुराचून रिंगणात होते. त्यांनी सलग आठव्यांदा विजय मिळवला आहे. त्यांची लढत भाजप सरकारमध्ये महसूल मंत्री असलेले आर अशोक यांच्या विरोधात होते. ज्याचा त्यांनी पराभव केला. कर्नाटकात काँग्रेसने सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे.
ईडीच्या रडारवर
डीके शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसमधील सर्वात श्रीमंत नेते आहेत. जेव्हा-जेव्हा काँग्रेस पक्षाला निधीची गरज भासते, तेव्हा शिवकुमार उभे राहिले आहेत. त्यामुळे ते संकटमोचक झाले आहेत. त्यांची सध्या सीबीआय, ईडी आणि प्राप्तिकर विभागाच्या चौकशी सुरु केली आहे. कर्नाटक निवडणुकीपूर्वी 104 दिवस ते तुरुंगात होते. सध्या ते जामिनावर आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या