Dushyant Chautala : 'त्यावेळी भाजपसोबत राहणं, माझ्या जीवनातील सर्वात मोठी चूक होती...',हरियाणाच्या माजी उपमुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
Dushyant Chautala News:हरियाणा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. जेजेपीचे नेते दुष्यंत चौटाला यांनी शेतकरी आंदोलनाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
Haryana Assembly Election 2024 चंदीगड : हरियाणा विधानसभा निवडणूक जाहीर झालेली आहे.या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान 5 ऑक्टोबरला होणार आहे. हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि जेजेपी हे प्रमुख पक्ष आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय नेत्यांकडून विरोधकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री आणि जेजेपीचे नेते दुष्यंत चौटाला यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शेतकरी आंदोलनाच्या काळात भाजपसोबत राहणं ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, असं चौटाला म्हणाले.
दुष्यंत चौटाला यांनी म्हटलं,राजकारणात अनेक विचारधारा जोडल्या जातात, त्यावेळा अनेकदा बदल देखील होत असतात, आम्ही हरियाणात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न केला, आम्ही परिवर्तन आणण्यासाठी काम केलं. आम्ही म्हटलं होतं की ज्यावेळी किमान आधारभूत किंमतीचा प्रश्न येईल त्यावेळी सरकार सोडू याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र देखील लिहिलं होतं, असं दुष्यंत चौटाला म्हणाले.
ती जीवनातील मोठी चूक
"आम्ही त्यांच्यासोबत सरकार चालवलं, आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी करुन घेतल्या, आपलं काम करुन घेतलं, मात्र जेव्हा निवडणूक लढवताना सहमती झाली नाही तेव्हा दोघांचे रस्ते वेगळे झाले. शेतकऱ्यांचं कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन सुरु होतं त्यावेळी भाजपसोबत राहण्याची भूमिका घेणं ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. ती चूक आज स्वीकारात आहे, असं दुष्यंत चौटाला म्हणाले. दुष्यंत चौटाला यांनी हरियाणाची जनता या निवडणुकीत साथ देईल, असंही म्हटलं.
...तर आश्वासनं पूर्ण झाली नसती
माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी पुढं म्हटलं की शेतकरी आंदोलनामध्ये सर्वात मोठा खलनायक महला ठरवलं गेलं. आमच्या पार्टीचा लोकसभेत सदस्य नसल्यानं तिथं देखील मतदान करण्याचा प्रश्न नव्हता. मात्र, मुद्यावर राजीनामा दिला असता तर सरकार पडलं असतं. आज नायब सिंह सैनी मुख्यमंत्री आहेत. पण, त्यावेळी आपण भाजपसोबत सरकार स्थापन केलं नसतं तर हरियाणाच्या जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण झाली नसती, असं म्हटलं.
इतर बातम्या :