(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Vidhan Sabha Elections : निवडणूक एका टप्प्यात, महायुतीचा कार्यक्रमही एकाच टप्प्यात; जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 : महाविकास आघाडीमध्ये 210 ते 218 जागांवर एकमत झालं असून उर्वरीत जागांवरही येत्या दोन दिवसात निर्णय होईल अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होणार असून त्याचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यावर आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. 'एकाच टप्प्यात निवडणूक, आता एकाच टप्प्यात कार्यक्रम' अशी सूचक प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली.
जयंत पाटील म्हणाले की, राज्यातील निवडणूक ही एकाच टप्प्यात होणार असून मतदानही महायुतीचा एकाच टप्प्यात पराभव करण्यासाठी तयार झाले आहेत. प्रचारासाठी वेळ कमी आहे, पण आम्ही सर्व ठिकाणी पोहोचू. महाविकास आघाडीमध्ये 210 ते 218 जागांवर एकमत झालं असून पुढच्या दोन दिवसात उर्वरित 60 जागांवरही एकमत होईल.
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीवरही जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली. 12 पैकी 7 जणांना आमदारकी दिली. आता उर्वरित 5 जागांचं आमिष इतर सगळ्यांना दाखवलं जाईल असा टोला जयंत पाटलांनी महायुतीला लगावला.
महाराष्ट्राची झाली तयारी
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) October 15, 2024
२० नोव्हेंबरला वाजवू तुतारी…#MaharashtraElection2024 @NCPspeaks pic.twitter.com/iU3UBAMmcu
जयंत पाटील म्हणाले की, "लोकसभेसाठी महाराष्ट्रात निवडणूक 7 टप्प्यात घेण्यात आली आणि आज अचानकपणे विधानसभा निवडणूक एका टप्प्यात जाहीर करण्यात आली. सरकारला बराच वेळ मिळाला आणि सरकारने मनाला येईल तशा योजना जाहीर केल्या. राज्याची तिजोरी रिकामी केली. तिजोरीत काहीही नसताना शक्य असेल तेवढं वाटप करण्याचा काम केलं. शेवटी आता निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यापुढे सरकार आता नवीन काही योजना जाहीर करणार नाही."
हे सरकार घाबरलेलं आहे म्हणून योजना जाहीर करून मतदान घेण्याचा प्रयत्न करत आहे. आता ते एका टप्प्यात पराभूत होतील असा टोला जयंत पाटलांनी लगावला.
असं असेल महाराष्ट्राच्या निवडणुकीचं वेळापत्रक -
- निवडणुकीचं नोटिफिकेशन : 22 ऑक्टोबर 2024
- अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर
- अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
- अर्ज मागे घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर
- मतदान : 20 नोव्हेंबर 2024
- मतमोजणी : 23 नोव्हेंबर 2024
288 जागांसाठी किती मतदार असतील?
- एकूण मतदार - 9 कोटी 63 लाख
- नव मतदार - 20.93 लाख
- पुरूष मतदार - 4.97 कोटी
- महिला मतदार - 4.66 कोटी
- युवा मतदार - 1.85 कोटी
- तृतीयपंथी मतदार - 56 हजारांहून जास्त
- 85 वर्षावरील मतदार - 12. 48 लाख
- शंभरी ओलांडलेले मतदार - 49 हजारांहून जास्त
- दिव्यांग मतदार - 6.32 लाख
महाराष्ट्रात किती मतदान केंद्र असणार?
- एकूण मतदान केंद्र - 1 लाख 186
- शहरी मतदार केंद्र - 42,604
- ग्रामीन मतदार केंद्र - 57,582
- महिला अधिकाऱ्यांची केंद्रे -
- एका मतदान केंद्रावर सरासरी मतदार - 960
ही बातमी वाचा: