Maharashtra Vidhan Sabha Election 2024: गरीब आहे म्हणता, मग वाटायला पैसे कुठून येतो?; अजितराव घोरपडे यांची रोहित पाटलांवर टीका
Tasgaon-Kavathe Mahankal Assembly constituency: संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ कवठेमहांकाळमधील सभेत अजितराव घोरपडे बोलत होते.
Tasgaon-Kavathe Mahankal Assembly constituency: कवठेमहांकाळ मतदारसंघातील विरोधी उमेदवार हे आम्ही गरीब आहोत. आम्हाला मतदान करा, असे म्हणतात. मग मतदानासाठी वाटायला पैसे कुठून आणता, अशा संतप्त सवाल माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे (Ajitrao Ghorpade) यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तासगाव कवठेमहांकाळचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांच्या प्रचारार्थ कवठेमहांकाळमधील सभेत अजितराव घोरपडे बोलत होते.
आबांचे (आरआर पाटील) सगळे घर सांगते की, आम्ही गरीब माणसे आहोत. आमच्याकडे लक्ष द्या.मग परवा वाटप करायला पैसे कुठून येतात?, हे पैसे कुठून आले हे फक्त शरद पवारच (Sharad Pawar) सांगू शकतात. दुसऱ्या कुणालाही हे माहीत नसणार...निवडणूका पैशाने विकत घ्यायच्या, सत्ता मिळवायची आणि मग पुन्हा सत्तेतुन पैसे मिळवायची, हा त्यातलाच प्रकार आहे, अशी टीका अजितराव घोरपडे यांनी केली.
भावाच्या प्रचारासाठी बहीण प्रचारात-
तासगाव कवठेमहांकाळ निवडणूकीत आरआर पाटील यांची लेक आणि रोहित पाटील (Rohit Patil) यांच्या बहीण स्मिता थोरात सक्रिय झाल्या आहेत. आरआर आबांना ज्या पद्धतीचा प्रतिसाद तासगाव कवठेमंकाळमध्ये जनतेकडून मिळत होता. तसाच प्रतिसाद रोहितला सुद्धा मिळतोय. जे आज रोहितच्या विरोधात उमेदवार आहेत. त्यांना आबांनी राजकीय पटलावरती चितपट केलं होतं. त्याच पद्धतीने रोहितसुद्धा विरोधी उमेदवारांना या विधानसभेच्या राजकीय पटलावरती त्याच मताधिक्याने चितपट करेल, याची मला नक्की खात्री आहे, असा विश्वास स्मिता थोरात यांनी व्यक्त केला. तसेच कवठेमंकाळ तालुक्यातील अजितराव घोरपडे गट जरी संजयकाका पाटील यांच्यासोबत या निवडणुकीत गेला असला तरी त्याचा फारसा परिणाम निकालावर होईल, असं वाटत नाही असे स्मिता थोरात यांनी सांगितले.
रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल-
तासगाव शहरात रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे आणि दिवाळीचा फराळ वाटल्याचा आरोप संजय काका पाटलांच्या कार्यकर्त्यांनी केला होता. याप्रकरणी आता निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त भरारी पथकाने कारवाई केलेय.. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या दोन कार्यकर्ते सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील आणि बाबासाहेब उर्फ खंडू निवृत्ती कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मतदारांना पैसे आणि दिवाळीचा फराळ वाटप करत आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला आहे.