आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर.आर. पाटील यांच्या नावाचा उल्लेख करत सिंचन घोटाळ्याबाबत भाष्य केलं.
सांगली : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराला सुरुवात झाली असून दिवाळीनंतरच राजकीय धमाके होणार आहे. दिवाळीनंतर सर्वच राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांच्या सभा होणा आहेत. मात्र, आजपासूनच राज्यातील बहुतांश मतदारसंघाती उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. सांगली जिल्ह्यातील कवटे-महंकाळ मतदारसंघात यंदा दिवंगत नेते आर.आर. पाटील यांच्या मुलाने म्हणजे रोहीत पाटील (Rohit Patil) यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. विशेष म्हणजे त्यांच्याविरोधात भाजपचे माजी खासदार आणि काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केलेले संजय काका पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. त्यामुळे, रोहीत पाटील यांनी प्रचाराचा नारळ फोडताच, संजय काका पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली. तसेच, आर.आर. आबांना काय त्रास झालाय, असे म्हणत वडिलांची आठवणही जागवली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर.आर. पाटील यांच्या नावाचा उल्लेख करत सिंचन घोटाळ्याबाबत भाष्य केलं. त्यामुळे, सध्या आर.आर. पाटील हे राज्यातील राजकारणात चर्चेत आहेत. त्यातच, आज रोहित पाटील यांनीही आर.आर. आबांचा उल्लेख करत स्थानिक राजकारणावर तोफ डागली आहे. वीस दिवस मला द्या, मी तुमच्यासाठी आयुष्य समर्पित करतो, आबांना काय मानसिक त्रास झाला आहे हे माहित आहे, याचं योग्य वेळी उत्तर देईन, असे म्हणत रोहीत पाटील यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकांचा शड्डू ठोकला आहे. मी नुसताच बोलतो अशी माझ्यावर टीका होते, दहा वर्ष तुम्ही संसदेत बोलला नाही म्हणून मी बोलल्याचे कौतुक होते, असे म्हणत रोहित पाटील यांनी संजय काका पाटील यांच्यावर खोचक टीका केली.
रोहित पाटील यांनी तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून आजपासून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तासगाव तालुक्यातील ढवळी येथे त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सभेमधून रोहित पाटील यांनी संजय काका पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. संजय काका पाटील म्हणतात, माझ्या विरोधात पुढे एक बाळ उभा आहे. यावर रोहित पाटील यांनी टीका करताना मग मी बाळ असेल तर तुमच्या बाळाने माझ्याविरोधात माघार का घेतली? असा प्रश्न उपस्थित केला.
बाळाच्या विरोधात उमेदवारी का बदलली
एका बाळाच्या विरोधात उमेदवारी बदलण्याचे संकेत का द्यावे लागले. आबांना काय मानसिक त्रास झाला आहे. हे मला माहित आहे,याचं योग्य वेळी उत्तर देईन असे देखील रोहित पाटील यांनी म्हटले. तसेच सातत्याने 35 वर्षे आम्ही काय केले असे प्रश्न विचारले जाते. त्यापूर्वी 35 वर्षे लोक तुम्हाला का नाकारत आहेत? याचा आधी विचार करा, असा टोलाही रोहित पाटलांनी संजय काका पाटलांना लगावला. तसेच मी नुसताच बोलतो अशी देखील माझ्यावर टीका होते. परंतु संजय काका पाटलांनी दहा वर्ष संसदेत काहीच बोलले नाही. त्यामुळे मी बोलण्याचं कौतुक होत असल्याचे देखील रोहित पाटलांनी यावेळी भाषणातून सांगितले.