(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hitendra Thakur: कुटुंब फोडल्याने हितेंद्र ठाकूर संतापले, भाजपला धडा शिकवण्याचा निर्धार, विधानसभा निवडणुकीत मविआला साथ देणार?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राजीव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास बविआला खिंडार पडू शकते. हितेंद्र ठाकूर यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता
मुंबई: गेल्या 10 वर्षांमध्ये बहुतांश वेळा भाजपला साथ देणारे बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर हे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ देण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून हितेंद्र ठाकूर यांचे आतेभाऊ राजीव पाटील (Rajeev Patil) उर्फ नाना हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. त्यांचा भाजपमधील प्रवेश जवळपास निश्चित असून ते नालासोपाऱ्यातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. सातत्याने मदत करुनही भाजपने पक्ष आणि कुटुंब फोडल्याने हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) संतापले आहेत. त्यामुळे आता ठाकूरांनी भाजपला (BJP) धडा शिकवण्याचा निर्धार केल्याचे समजते. परिणामी विधानसभा निवडणुकीत त्यांनी मविआची साथ घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे, असे वृत्त 'दैनिक लोकसत्ता'ने दिले आहे.
गेल्या 35 वर्षांपासून वसई-विरारच्या राजकारणात हितेंद्र ठाकूर यांची एकहाती सत्ता आहे. या भागात हितेंद्र ठाकूर यांच्या संमतीशिवाय इकडची काडी तिकडे होत नाही, असा त्यांचा लौकिक आहे. मात्र, आता भाजपने त्यांचे आतेबंधू राजीव पाटील यांना गळाला लावल्याने हितेंद्र ठाकूर यांच्या मक्तेदारीला कडवे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.
हितेंद्र ठाकूर यांचा मुलगा क्षितिज ठाकूर हे तीनवेळा नालासोपाऱ्यातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. राजीव पाटील यांना नालासोपाऱ्यातून लढण्याची इच्छा होती. मात्र, हितेंद्र ठाकूर यांनी पुत्राला झुकते माप दिल्याने राजीव पाटील यांची इच्छा अपुरी राहिली होती. मात्र, आता ते भाजपमध्ये गेल्यास नालासोपाऱ्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकतात. त्यामुळे क्षितिज ठाकूर यांच्यासमोरही आव्हान उभे ठाकण्याची शक्यता आहे.
राजीव पाटील भाजपची साथ मिळाल्यास हितेंद्र ठाकूरांना शह देणार?
हितेंद्र ठाकूर यांचा थेट पराभव करणे शक्य नसल्याने भाजपने राजीव पाटील यांना गळाला लावल्याची चर्चा आहे. वसई-विरार महानगरपालिकेचे महापौर, कामगार नेते, वसईतील बडे बांधकाम उद्योजक अशी राजीव पाटील उर्फ नाना यांची ख्याती राहिली आहे. राजीव पाटील यांचा स्वत:चा कार्यकर्ता वर्ग आणि समांतर यंत्रणा वसई शहरात कार्यरत आहे. त्यामुळे राजीव पाटील यांना फोडून हितेंद्र ठाकूर यांना शह देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. राजीव पाटील हे बांधकाम उद्योजक असल्याने त्यांचे व्यापारी आणि बांधकाम उद्योजकांशी चांगले संबंध आहेत.याशिवाय, त्यांच्याकडे प्रचंड आर्थिक शक्तीही आहे. परिणामी राजीव पाटील हे महाशक्तीची साथ मिळाल्यास हितेंद्र ठाकूर यांना शह देऊ शकतात, असा अंदाज आहे. त्यामुळेच आता राजीव पाटील आणि भाजपला शह द्यायचा असल्यास हितेंद्र ठाकूर यांना मविआची साथ घेणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
आणखी वाचा
हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता