Gujarat Election 2022 : गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान; पंतप्रधान, गृहमंत्र्यांसह VIP मतदार कधी मतदान करणार?
Gujarat Election 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज 5 डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह दिग्गज नेते आज मतदान करणार आहेत.
Gujarat Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज 5 डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी हे मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात आज 14 जिल्ह्यांतील 93 जागांवर मतदान होणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. बनासकांठा, पाटण, मेहसाणा, साबरकांठा, अरवली, गांधीनगर, अहमदाबाद, आनंद, खेडा, महिसागर, पंचमहाल, दाहोद, वडोदरा आणि छोटा उदेपूर या जिल्ह्यातील हे 93 मतदारसंघ आहे. पहिल्या टप्प्यासह दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाची मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे. गुजरातमध्ये भाजप सत्ता राखणार की विरोधक पूर्ण ताकदीने सत्तापालट करणार याचा निर्णय 8 डिसेंबरला लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह दिग्गज नेते आज मतदान करणार आहेत. जाणून घेऊया पंतप्रधान, गृहमंत्र्यांसह व्हीआयपी मतदार कधी मतदान करणार आहेत.
व्हीआयपी मतदारांच्या मतदानाची वेळ
- पंतप्रधान नरेंद्र मोदी : सकाळी साडेआठ वाजता अहमदाबादमधील रानिप इथल्या निशान शाळेत मतदान करणार. (पंतप्रधान मोदी रविवारी संध्याकाळीच गुजरातमध्ये पोहोचले आणि त्यांच्या आईची भेट देखील घेतली)
- गृहमंत्री अमित शाह : सकाळी साडेदहा वाजता अहमदाबादमधील म्युनिसिपल सब झोनल ऑफिस इथे मतदान करणार
- गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल : सकाळी 9 वाजता अहमदाबादमधील शीलज प्राथमिक शाळेतील केंद्र क्रमांक 95 मध्ये मतदानाचा हक्क बजावणार.
- उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल : सकाळी साडेआठ वाजता अहमदाबादमधील शीलज प्राथमिक शाळेत मतदान करणर
- पंतप्रधान मोदी यांच्या आई हीराबा : गांधीनगरच्या रायसनमधील दयाबेन वाडीबाई पटेल शाळेत सकाळी साडेआठ वाजता मतदानाला पोहोचणार
- राज्यपाल आचार्य देवव्रत : गांधीनगरच्या सेक्टर 20 मधील केंद्रावर मतदान करणार
- भरत सोलंकी (माजी गुजरात काँग्रेस अध्यक्ष) : सकाळी सव्वा आठ वाजता आणंद जिल्ह्यातील बोरसादच्या डेडरडा गावातील प्राथमिक शाळेत मतदान करणार
- मधुसूदन मिस्त्री : सकाळी आठ वाजता गांधीनगरच्या सेक्टर 8 मध्ये मतदान करणार
- शंकर सिंह वाघेला : सकाळी साडेनऊ वाजता आणंद जिल्ह्याच्या वल्साडमध्ये मतदान करणार
- शक्ति सिंह गोहिल : सकाळी 11 वाजता गांधीनगरच्या सेक्टर 20 मध्ये मतदान करणार
- गुजरात प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जगदीश ठाकोर : सकाळी 10 वाजता अहमदाबादच्या नरोदामध्ये पंचायत कन्या शाळेत मतदानासाठी हजेरी लावणार
- जिग्नेश मेवानी : अहमदाबादच्या मेघानी नगरमध्ये मतदानाचा हक्क बजावणार
- क्रिकेटर इरफान पठाण, युसुफ पठाण आणि परिवार : वडोदरामध्ये दुपारी मतदान करणार
कोण किती जागा लढवणार?
या टप्प्यात भाजप सर्व 93 जागांवर निवडणूक लढवत आहे. शिवाय अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप सर्व 93 जागांवर लढत आहेत. काँग्रेस 90 जागांवर निवडणूक लढवत असून त्यांचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) दोन जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भारतीय आदिवासी पक्षाने (BTP) 12 उमेदवार उभे केले आहेत आणि बहुजन समाज पक्षाने (BSP) 44 उमेदवार उभे केले आहेत.