एक्स्प्लोर
Advertisement
बारामतीत अजित पवारांविरोधात गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी
अजित पवारांना 2014 च्या विधानसभा निवडणुकीत एक लाखापेक्षा अधिकचं मताधिक्य मिळालं होतं. त्यामुळे गोपीचंद पडळकरांना वाटते तितकी ही लढाई सोपी नसणार आहे.
मुंबई : राजीनामा नाट्यानंतर पुन्हा बारामतीच्या आखाड्यात उतरलेल्या अजित पवार यांच्याविरोधात, भाजपने गोपीचंद पडळकर यांना रिंगणात उतरवलं आहे. वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील गरवारे क्लबमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पडळकरांनी भाजपचा झेंडा हातात धरला आणि याचवेळी मुख्यमंत्र्यांनी गोपीचंद पडळकरांना बारामतीची उमेदवारी घोषित केली.
गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीचा दौंड, इंदापूरला फायदा
बारामतीसोबतच दौंड आणि इंदापूर तालुक्यातही धनगर समाज जास्त आहे. मागील वर्षी दौंडमधून रासप चे राहुल कुल तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दत्तात्रय भरणे हे निवडून आले आहेत. या दोघांना धनगर समाज्याच्या मतांचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला होता. भरणे हे स्वतः धनगर समाजाचे असल्याने त्यांना धनगर समाज्याचा मोठा फायदा होतो, तर राहुल कुल यांना रासपचे तिकीट मिळाल्याने त्यांनाही धनगर समाजाच्या मतांचा फायदा झाला. त्यामुळे या मतांचा फायदा जर घ्यायचा असेल तर आक्रमक असलेले आणि धनगर समाजाचे नेते समजले जाणारे गोपीचंद पडळकर यांच्या बारामतीच्या उमेदवारीचा फायदा शेजारीच असलेल्या इंदापूर आणि दौंडमधील भाजपच्या उमेदवारांना नक्कीच होऊ शकतो.
धनगर समाजाची निर्णायक मतं कोणाच्या पारड्यात?
अजित पवारांना 2014 च्या विधानसभा निवडणुकीत एक लाखापेक्षा अधिकचं मताधिक्य मिळालं होतं.त्यामुळे पडळकरांना वाटते तितकी ही लढाई सोपी नसणार आहे. पडळकरांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढली तरी बारातमीत पवार कुटुंबीयांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे भाजपाकडून पडळकरांची उमेदवारी निश्चित झाल्याने बारामती मतदारसंघातील बुहसंख्येने असणारा धनगर समाज आपले निर्णायक मत कोणाच्या पारड्यात टाकणार आणि कोणाला विजयी करणार याची उत्सुकता आहे.
इच्छुकांचे काय?
भाजपचे नेते बाळासाहेब गावडे, महानंदचे संचालक दिलीप खैरे, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांच्या नावाची भाजपमधून चर्चा होती. मात्र या स्थानिक नेत्यांना डच्चू देत गोपीचंद पडळकर यांना बारामतीची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आयात उमेदवाराचं काम ही मंडळी कसं करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.
लोकसभेला पडळकरांमुळे भाजपचा विजय सुकर
गोपीचंद पडळकरांनी लोकसभा निवडणूक सांगलीतून वंचित बहुजन आघाडीकडून लढवली होती.तेथे खासदार संजयकाकांच्या बाजूने फार हवा नव्हती, त्यात स्वाभिमानी पक्षाकडून विशाल पाटलांना तिकीट मिळालं आणि लढत चुरशीची बनली. निवडणुकीत संजयकाकांना 5 लाख 8 हजार मतं मिळाली, विशाल पाटलांना 3 लाख 44 हजार मतं मिळाली तर तब्बल 3 लाख मतं घेत पडळकरांनी भाजपच्या संजयकाकांचा मार्ग सुकर केला. आता बारामतीत पडळकर अजित पवारांना कशी टक्कर देणार हे पाहावं लागेल.
पडळकरांच्या रुपाने भाजपचं धनगर कार्ड
धनगर आरक्षण आंदोलनात घेतलेल्या सक्रिय सहभागातून गोपीचंद पडळकर यांचे नेतृत्व उद्यास आले आणि ते राज्यभर ओळखले जाऊ लागले. बारामती विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा विचार करता, धनगर समाजाची मतदार संख्या दोन क्रमांकावर आहे. सर्वात जास्त मराठा समाज, त्यानंतर धनगर समाज अशी मतदारांची संख्या आहे. ही मतदार संख्या विचारात घेऊनच भाजपाने पडळकर यांच्या रुपाने धनगर कार्ड वापरले असल्याचं दिसून येतं. बारामती मतदारसंघात धनगर समाजातील मतदारसंख्या अधिक आहे. धनगर समाजाचे राज्यातील अभ्यासू, नेतृत्व म्हणून भाजपाकडून गोपीचंद पडळकर यांच्या रुपाने बारामतीतून उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आलं.
पवारांचा बालेकिल्ला बारामती
बारामती पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. बारामतीत गेली पाच दशकं पवार कुटुंबाची सत्ता आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून 1967 ते 1990 पर्यंत सहावेळा शरद पवार आमदार होते. त्यानंतर 1991 ची पोटनिवडणूक आणि त्यानंतर 1999 ते 2014 पर्यंत अजित पवार या मतदारसंघातून सहज जिंकत आले आहेत. 1991 पासून 2014 पर्यंत सलग पाच वेळा हनुमंत कोकरे, रतन काकडे, चंद्रराव तावरे, पोपटराव तुपे, रंजन तावरे, बाळासाहेब गावडे या स्थानिक उमेदवारांवर मात करुन अजित पवार विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. बारामती मतदारसंघावर पवारांची असणारी मजबूत पकड, गावोगावी कार्यकर्त्यांचे जाळे, अन् जनसमान्यांशी असणारा दांडगा जनसंपर्क, शिवाय बारामतीतील धनगर समाजातील अनेकांना त्यांनी वेगवेळ्या पदांवर दिलेली संधी ही त्यांची जमेच्या बाजू आहेत.संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement