(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Election Result 2022 : पंजाब वगळता अन्य चार राज्यात भाजपची आघाडी, काँग्रेसला मोठा धक्का
विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. पंजाब वगळता अन्य चार राज्यांमध्ये भाजपचे उमेदावर आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.
Election Result 2022 : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. पंजाब वगळता अन्य चार राज्यांमध्ये भाजपचे उमेदावर आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. पंजाबमध्ये जनतेनं काँग्रेसला नाकारल्याचे चित्र दिसत आहे. अद्याप संपूर्ण निकाल हाती आले नाहीत. पण आता आलेल्या माहितीनुसार आम आदमी पार्टी 60 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर उत्तर प्रदेशसह, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या चार राज्यांमध्ये भाजपने चांगलीच मुसंडी मारली आहे. या चारही राज्यात भाजपला मोठी आघाडी मिळाली आहे.
हळूहळू पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. आत्तापर्यंत पाच राज्यांपैकी भाजपचे उमेदवार चार राज्यात आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा हादरा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत 20 जागा मिळवणाऱ्या आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये चांगलीच मुसंडी मारली आहे. पंजाबमध्ये आपचे 80 उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांची वाटचाल बहुमताच्या दिशेने सुरु आहे.
दुसरीकडे राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा भाजपच सत्तेत येण्याचे संकेत मिळत आहेत. कारण जवळपास 250 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. तर समाजवादी पार्टी पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. समाजवादी पार्टी 110 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. इतर पक्षांचे उमेदवार हे 13 जागांवर आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर विधानसभेच्या 40 जागा असलेल्या गोवा राज्यात देखील भाजप आघाडीर असल्याचे दिसत आहे. सुरुवातीला गोव्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यात काँटे की टक्कर होती. मात्र, ता भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपने 17 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रसने 13 जागांवर आघाडी घेतली आहे.
त्याचबरोबर उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये देखील भाजप आघाडीवर आहे. उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या 70 जागा आहेत. यामध्ये 44 जागांवर भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस 23 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर 3 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे उत्तराखंडमध्ये पुन्हा भाजपचीच सत्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच मणिपूरमध्ये देखील भाजपने आघाडी घेतली आहे. मणिपूरमध्ये भाजपने 25 जागांवर आघाडी घेतली हे. तर काँग्रेस 12 जागांवर आघाडी आहे. एनपीएफ 10 जागांवर तर इतर 13 जागांवर आघाडीवर आहेत.
दरम्यान, देशामध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत पाच राज्यांमध्ये प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान झाले होते. त्याठिकाणी एकूण 403 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे तिथे कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. कारण दिल्ली गाठण्याचा मार्ग युपीमधून जातो असे म्हटले जाते. त्यामुळे राजकीयदृष्ट्या यूपी हे अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे. त्यानंतर मणिपूरमध्ये 60 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले होते. तसेच गोव्यात 40 जागांसाठी एकाट टप्प्यात, उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी एकाच टप्प्यात आणि पंजाबमध्ये 117 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते.
महत्त्वाच्या बातम्या: