Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
Eknath Shinde : मुंबईचा महापौर शिवसेनेचा व्हावा अशी भावना शिवसैनिकांची असल्याचा प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला होता. त्यावर एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा महापौर होईल, असं म्हटलं.

BMC Election 2026 मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या मुंबईतील नगरसेवकांना मार्गदर्शन केलं आहे. नगरसेवकांना मार्गदर्शन केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. नगरसेवकांनी वॉर्डचा कायापालट कसा होईल, वॉर्ड चकाचक कसा होईल. आपला वॉर्ड सगळ्यात आदर्श होईल यासाठी प्रत्येक नगरसेवकानं काम केलं पाहिजे. नगरसेवकांमध्ये विकासाची स्पर्धा लागली पाहिजे. मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलेलं आहे. भावनिक मुद्दे मुंबईकरांनी नाकारले आहेत, विकासविरोधी भूमिका असणाऱ्यांना मतदारांनी नाकारलं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
नगरसेवकांनी संधीचं सोनं करावं: एकनाथ शिंदे
महायुतीला मोठी संधी मिळालेली आहे. या संधीचं सोनं करणं आवश्यक आहे, अशा प्रकारच्या सूचना नगरसेवकांना दिल्या आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. शिवसेनेचा गट कोकण भवनमध्ये रजिस्टर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईकरांनी विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम शिवसेनेच्या आणि महायुतीच्या नगरसेवकांनी करावं अशी अपेक्षा आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून समोर आल्याचा आनंद आहे. विधानसभेत शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महापालिकेत शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. हा विजय म्हणजे उद्याच्या लोकसभेची आणि विधानसभेची पायाभरणी आहे. त्यासाठी नगरसेवकांनी आदर्श वॉर्ड निर्माण झाले पाहिजेत आणि आदर्श नगरसेवक म्हणून काम केलं पाहिजे. आपण निवडून दिलेला नगरसेवक, लोकप्रतिनिधी कसा योग्य आहे, ही भावना लोकांच्या मनात निर्माण झाली पाहिजे, असं मार्गदर्शन केल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
मुंबईचा महापौर युतीचा होणार
तुमच्या वागण्यावर आणि बोलण्यावर नागरिकांचं लक्ष आहे. शिवसेनेच्या नावाला गालबोट लागेल, असं कोणतंही कृत्य नगरसेवकांनी करु नये, असं एकनाथ शिंदे म्हणाले. लाडकी बहीण योजना नगरपालिका, महापालिका आणि विधानसभेला गेमचेंजर ठरलीय, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. माझ्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात काम केलं ते लोकांनी स्वीकारलेलं आहे. शिवसेनेचे 400 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. जनतेनं दिलेला कौल मान्य केला आहे, त्रुटी असतील काही राहून गेलं असेल ते दुरुस्त केलं जाईल, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का, शिवसेनेला लोकं घाबरतात. नवीन नगरसेवक निवडून आले आहेत,विचारांची देवाण घेवाण व्हावी. प्रस्ताव कसे बनवायचं, याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. सर्वांना एकत्र बोलायचं होतं, त्यासाठी नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलंय. मुंबईचा महापौर महायुतीचा होईल महायुतीचा होईल, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. उद्धव ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावेत, असंही शिंदे यांनी म्हटलं.




















