Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच मौन, नेमकं मनात काय?; सर्व भेटीगाठी नाकारल्या, आमदारांना म्हणाले, मुंबईत....
Eknath Shinde: भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
Eknath Shinde Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: विधानसभेचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला घवघवीत यश मिळाले, त्यानंतर गेल्या अडीच वर्षांच्या प्रचंड कामाच्या बळावर पुन्हा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार असे दिसत असताना आता मात्र भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
एकनाथ शिंदे यांनी मौन बाळगले -
23 तारखेनंतर एकनाथ शिंदे यांनी मौन बाळगले आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. कारण एकत्रित झालेल्या प्रेस कॉन्फरन्स नंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलणे तसे टाळले आहे, तसेच आमदार, खासदार यांच्या भेटी देखील त्यांनी टाळल्या आहेत, त्यांच्या मौनाचे नेमके काय कारण हे कळू शकले नसले तरी एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे.
मुंबईत थांबू नका, एकनाथ शिंदेंचे आदेश-
मुंबईत थांबू नका, आपआपल्या मतदारसंघात जा, जल्लोष साजरा करा, विजयी रॅली काढा असा आदेश एकनाथ शिंदेंनी आमदारांना दिला आहे. निकालानंतर सर्व आमदारांना मुंबईत बोलवलं होतं, सर्व आमदारांना वांद्र्यातल्या ताज लॅड्स एन्ड मध्ये ठेवण्यात आलं होतं. दोन दिवसापासून एकनाथ शिंदेंनी सर्व गाठीभेटी नाकारल्या. सर्व आमदार भेटण्यासाठी जात होते, सर्व आमदारांना मतदार संघात जाण्याचे आदेश एकनाथ शिंदेंनी दिला आहे.
अनेक आमदार मुंबईत तळ ठोकून-
मंत्रिपदाच्या लॉबिंगसाठी अनेक आमदार मुंबईत तळ ठोकून आहेत.अनेक नव्या चेहऱ्याची वर्णी यंदा मंत्रिमंडळात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच पून्हा मंत्रिपद मिळावे यासाठी माजी मंत्र्यांची शिवसेनेत लॉबिंग सुरु झाली आहे. ज्यांच्याकडे मंत्रिपदे होती ती पुन्हा मिळवण्यासाठी आमदारांची रस्सीखेंच देखील सुरु झाली आहे. दरम्यान, मोठा भाऊ भाजप असल्याने त्यांना मंत्रिपदे जास्त मिळतील, त्यामुळे शिवसनेच्या वाट्याला कमी मंत्रीपद येऊ शकतात.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असावेत; मराठा क्रांती ठोक मोर्चाची भूमिका
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही. महायुतीतील घटक पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ सुरू असताना आता मराठा क्रांती ठोक मोर्चानेही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असावे अशी भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठी एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करावे असं मत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी मांडलं. विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहून महायुतीला मतदान केलं. त्यामुळे महायुतीचा राज्यभरात दणदणीत विजय झाला. राज्यात सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाण्यासाठी मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असायला हवेत असं मराठा ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक म्हणाले.