एक्स्प्लोर
सोशल मीडियावरचा 'तो' व्हिडीओ बनावट, वक्तव्याचा विपर्यास केला, धनंजय मुंडेंचा खुलासा
धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर खालच्या भाषेत टीका केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पंकजा मुंडे समर्थकांनी धनंजय मुंडे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : सोशल मीडियावर पंकजा मुंडे यांच्या विरोधात व्हायरल होत असलेला व्हिडीओ बनावटी असून ती क्लिप एडिट करून व्हायरल केली आहे. व्हिडीओ क्लिप माझ्या वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे, असा खुलासा धनंजय मुंडे यांनी दिला आहे. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर खालच्या भाषेत टीका केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पंकजा मुंडे समर्थकांनी धनंजय मुंडे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. याबाबत धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहीत खुलासा केला आहे. शनिवारी माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेली ती क्लिप एडिट करून, वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासावी, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. अशी क्लिप एडिट करणाऱ्यांनी किमान बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा, आपली निवडणूक विकास कार्यावर आहे, ती भावनिकतेवर घेऊन जाताना इतकी खालची पातळी गाठू नका ही कळकळीची विनंती आहे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे. मी विरोधासाठी राजकारण करत नाही तर परळीच्या विकासासाठी राजकारण करतोय. या निवडणुकीत आपण फक्त परळीच्या विकासासाठी लढतोय. परळीतील नागरिकांचाही या लढ्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. काही जणांना निकाल लागण्याआधीच पराभवाची भीती वाटू लागली आहे. म्हणून ही विकासाची निवडणूक पुन्हा भावनिकतेच्या मुद्यावर आणण्याचा काहींचा प्रयत्न सुरू झाला आहे. पण हा प्रयत्न व्यर्थ ठरणार हे निश्चित, असेही त्यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे सभेदरम्यान चक्कर येऊन स्टेजवरच कोसळल्या मी जे कधी बोललोच नाही त्याच्या खोट्यानाट्या क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत. मी आजपर्यंत कोणाचेही वाईट केले नाही, कोणाचे वाईट चिंतिले नाही. माझ्या विरोधकांबाबत मी कधी अपशब्द देखील वापरला नाही. काहींनी तर मला राक्षस म्हणून हिणवलं पण मी माझे तत्व सोडले नाही. मी कालही तत्वाचे राजकारण करत होतो आजही तत्वाचे राजकारण करत आहे. मी माझ्या 1500 बहिणींचे कन्यादान केले आहे. मी कधीही कोणत्याच महिलेबाबत चुकीच्या शब्दांचा वापर करणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये ही विनंती, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल परळी मतदार संघातील लढत लक्षवेधी झाली असून आरोप प्रत्यारोप झाल्याने निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेवटच्या प्रचार सभेत पंकजा मुंडे यांना भोवळ येऊन त्या खाली पडल्या. यानंतर त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियातून धनंजय मुंडे यांनी जे भाषण केले त्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. 'धनंजय मुंडे मुर्दाबाद' अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी थेट परळी पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल करत अटकेची मागणी करीत घोषणाबाजी केली होती. जोवर गुन्हा दाखल होत नाही, तोवर पंकजा मुंडे समर्थक पोलीस स्थानकातच ठाण मांडून बसले होते. अखेर जुगल किशोर लोहिया यांच्या तक्रारीवरुन परळी शहर पोलीस ठाण्यात अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे 509, 294, 500 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्राईम
राजकारण
व्यापार-उद्योग




















