Devendra Fadnavis: मला आता मुख्यमंत्रीपदाची लालसा उरलेली नाही, जी जबाबदारी मिळेल ती पार पाडेन: देवेंद्र फडणवीस
ABP majha maharashtra majha vision: मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीसांच मोठं भाष्य.
मुंबई: महाराष्ट्रात 2014 पासून राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रीपदाविषयी पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. मला आता मुख्यमंत्रीपदाची (Maharashtra CM) लालसा उरलेली नाही, असे त्यांनी म्हटले. ते बुधवारी एबीपीच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमात बोलत होते. मी पाच वर्षे राज्याचा मुख्यमंत्री होतो. आतापर्यंत महाराष्ट्रात फक्त दोन मुख्यमंत्र्यांनाच 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला. त्यापैकी एक म्हणजे वसंतराव नाईक आणि दुसरा म्हणजे मी. त्यामुळे आता मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न किंवा लालसा माझ्या मनात उरलेली नाही. आता मला जी जबाबदारी देण्यात येईल, त्यामध्ये मी काम करेन. महायुती ज्याला मुख्यमंत्री ठरवेल, त्याच्या पाठिशी मी ठामपणे उभा राहीन, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी, तुम्हाला भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बसण्यात रस आहे का, या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. राजकारणात अशा चर्चा होत असतात, त्याची उत्तर द्यायची नसतात, असे फडणवीसांनी म्हटले. आर्थिक क्षेत्रात काम करणे ही माझी आवड होती. वकिली करणे हे माझे स्वप्न होते, पण ते स्वप्न भंगले. त्यामुळे मी गेल्या 25 वर्षांपासून विधानसभेत जनतेची वकिली करत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही सडकून टीका केली. भाजप हा महायुतीमधील शक्तिशाली पक्ष असल्याने मविआचे नेते भाजपवर जास्त हल्ले करत आहेत. मविआच्या थिंक टँकने तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक हल्ला करा, त्यांची इमेज डाऊन करा, जेणेकरुन भाजप आणि महायुतीची ताकद कमी होईल, असा सल्ला दिल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले?
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जागा कमी पडल्या तर उद्धव ठाकरे की शरद पवार , कोणासाठी दरवाजे उघडणार?, असा प्रश्न या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला. यावर फडणवीसांनी क्षणाचाही विलंब न लावता म्हटले की, आम्हाला कोणाचीही गरज लागणार नाही. तशी परिस्थितीची येणारच नाही. 23 तारखेची वाट बघा, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला आम्ही निकालानंतर ठरवू, असेही देवेंद्र फडवीस यांनी म्हटले.
आणखी वाचा
उद्धव ठाकरेंसाठी दरवाजे उघडणार का?; देवेंद्र फडणवीस म्हणाले, 23 तारखेची वाट बघा...