Devendra Fadnavis: खचलेल्या कार्यकर्त्यांना धीर दिला, प्रदेशाध्यक्षांची पाठराखण केली अन् उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची भाषा; देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेने खळबळ
Maharashtra Politics: महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. किंबहुना आमच्या आपेक्षापेक्षा खूप कमी जागा मिळाल्या. महाराष्ट्रात आमची लढाई महाविकास आघाडीसोबत होतीच, त्यासोबतच नरेटिव्हसोबत करावी लागली. त्यामध्ये सविंधान बदलणार असा नरेटिव्ह तयार करण्यात आला.
मुंबई: राज्यात 45 पेक्षा जास्त जागा मिळवण्याची भाषा करणाऱ्या भाजपप्रणित महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. महायुतीला अवघ्या 17 जागा मिळाल्या. तर गेल्या निवडणुकीत 23 खासदार निवडून आणणाऱ्या भाजपची 9 जागांपर्यंत घसरण झाली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत थेट उपमुख्यमंत्रीपद सोडून भाजप (BJP) पक्षसंघटनेसाठी पूर्णवेळ काम करण्याची इच्छा बोलून दाखवली. देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो, असे सांगितले. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी म्हटले की, भाजपमध्ये सगळे निर्णय पक्ष घेतो. पण मी पक्षाला विनंती करतो की, मला आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पूर्णवेळ उतरायचे आहे. त्यासाठी मी शीर्षस्थ नेतृत्त्वाला विनंती करणार आहे, त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं, मला पक्षात पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी. जेणेकरुन पक्षसंघटनेत ज्या काही कमतरता राहिल्या आहेत, त्या दूर करण्यासाठी मला वेळ देता येईल. मी सरकारमधून बाहेर राहिलो तरी आम्हाला जे काही करायचं आहे ते आमची टीम करेल. यासंदर्भात मी पक्षाच्या वरिष्ठांना भेटणार आहे आणि त्यांच्या सल्ल्याने पुढच्या गोष्टी करेन, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
फडणवीसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना धीर दिला
या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा पराभव झाला असला तरी आमच्या मतदानाची टक्केवारी महाविकास आघाडीपेक्षा जास्त असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेले आहे. आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही चांगले काम केले, ते प्रचंड फिरले. मुंबईच्या प्रदेशाध्यांनाही चांगले काम केले, असे सांगत फडणवीसांनी आशिष शेलार यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
देशातील एनडीएच्या यशावर फडणवीस काय म्हणाले ?
देशभरातील भाजपच्या आणि एनडीएच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो. पंडीत नेहरु यांच्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा आशीर्वाद जनतेने मोदींना दिला. एनडीएचं सरकार देशात येते. 1962 नंतर पहिल्यांदाच तिसऱ्यांदा सरकार होतेय. ओदिशामध्ये भाजपचं प्रथमचं सरकार होतेय. आध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबूंच्या नेतृत्वात पसंती दिली, आरुणाचलमध्य पुन्हा भाजपचं सराकर आले. लोकसभासोबत एनडीए आणि भाजपला मोठा कौल दिला. त्याबद्दल जनतेचे आभार, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आणखी वाचा