Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या काकूने सांगितली एकत्र कुटुंब पद्धतीची कहाणी; 'भिशी' चा उल्लेख करत म्हणाल्या...
Devendra Fadnavis CM : देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी एबीपी माझासोबत बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय.
नागपूर : मुख्यमंत्री होऊ घातलेल्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बालवयात त्यांची इंदिरा कॉन्व्हेंट शाळा का सोडून दिली होती? देवेंद्र फडणवीस यांना आणीबाणीमध्ये वडील आणि काकू यांच्याकडे तुरुंगात का जायचं होतं? पोलिसांनी आपल्याला पकडावं आणि तुरुंगात न्यावं यासाठी बालवयाचे देवेंद्र फडणवीस काय करत होते? देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस (Shobhatai Fadnavis) यांनी एबीपी माझासोबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या आयुष्यातला भन्नाट किस्सा सांगितला.
विशेष म्हणजे पाच वेळेला आमदार राहिलेल्या शोभाताई फडणवीस यांच्या सोबतच देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणाचे पहिले धडे शिकले होते. आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस राज्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जातील आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा अंत्योदयाचा स्वप्न साकार करतील असा विश्वासही शोभाताई फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. एवढेच नाही तर राजकारणासह विविध क्षेत्रात अत्यंत व्यस्त असलेल्या फडणवीस कुटुंबाला एकसंघ ठेवण्यासाठी आजही कुटुंबात एकत्रित भिशी कशी चालते आणि त्याच्या माध्यमातून कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांना कसे भेटतात याचे किस्से ही शोभाताई यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे राज्याचे राजकारणात काका आणि पुतण्यांमध्ये राजकीय स्पर्धेचे अनेक उदाहरण असले तरी आमच्या घराण्यात ती स्पर्धा नाही असेही गर्वाने आपल्या पुतण्याबद्दल शोभाताई फडणवीस यांनी सांगितले आहे.
देवेंद्रने भविष्यातही खूप प्रगती करावी
देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होत आहेत. याबाबत विचारले असता शोभाताई फडणवीस म्हणाल्या की, आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे. त्याने मोठ्या प्रमाणात स्वतःचे अस्तित्व निर्माण केलं. महाराष्ट्राला न्याय देण्याचं काम त्याने केलं. तो अजून मोठा व्हावा, भविष्यात देखील त्याने खूप प्रगती करावी, अशी आमची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले.
1990 सालच्या निवडणुकीत पहिल्यांदा राजकारणाचे धडे
देवेंद्र फडणवीस यांचा राजकारणाशी पहिल्यांदा संबंध कधी आला. याबाबत विचारले असता गंगाधरराव फडणवीस हे आमच्या घरातील पहिले आमदार आमदार झाले. नंतर मी आमदार झाले, मी मंत्री झाले. देवेंद्र हा आमच्याकडे राहिलेला असल्यामुळे ग्रामीण भागाशी त्याचा संबंध आला. त्यामुळे ग्रामीण भागाच्या अडचणी त्याला माहिती होत्या. 1990 सालच्या निवडणुकीत ग्रामीण भागात त्याने प्रचार केला. खऱ्या अर्थाने राजकारणाचे धडे त्यालाच तिथेच मिळाले, असे शोभाताई फडणवीस यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीसांनी इंदिरा कॉन्व्हेंट शाळा का सोडली?
देवेंद्र फडणवीस यांनी इंदिरा कॉन्व्हेंट शाळा का सोडून दिली? असे विचारले असता त्या म्हणाल्या की. देवेंद्रचे त्याच्या वडिलांवर अतिशय प्रेम होते. तो माझ्याकडे वाढला असल्याने माझ्यावरदेखील त्याचे तेवढेच प्रेम आहे. आम्ही दोघेही जेलमध्ये असल्याने त्याला असं वाटलं की, इंदिरा गांधींनीच माझ्या काकू आणि वडिलांना जेलमध्ये टाकले. त्याच्या मनात लहानपणी खूप चीड होती. त्यामुळे त्याला आमच्या सोबत जेलमध्ये यायचे होते. नंतर त्याला असं वाटलं की, मला इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये जायचं नाही, त्यामुळे इंदिरा कॉन्व्हेंट सोडून आम्ही त्याचे नाव सरस्वती विद्यालयात टाकले, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आजही आमच्याकडे एकत्र कुटुंब पद्धती
फडणवीस कुटुंबाने एकत्रित कुटुंब पद्धती जपली. त्याचे संस्कार आणि फायदे भविष्यात पुढच्या पिढीला मिळत गेले. याबाबत विचारते असता त्या म्हणाल्या की, आजही आमच्याकडे एकत्र कुटुंब पद्धती आहे. प्रत्येक कार्यक्रमात सगळे एकत्र येतात. एक भिशी आम्ही चालवतो, जेणेकरून सर्व कुटुंब महिन्यातून एकदा एकत्र आले पाहिजे. त्यामुळे घराणे एकत्र करून ठेवायचे आणि एकत्र बांधून ठेवायचे काम फडणवीस कुटुंबाने व्यवस्थित सांभाळले आहे, असे ज्योतीताई फडणवीस यांनी म्हटले.
आणखी वाचा