(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde: उपमुख्यमंत्रीपदासह गुहमंत्रीपदाची मागणी? एकनाथ शिंदे म्हणाले, 'याबाबतची चर्चा महायुतीमध्ये....'
Eknath Shinde: गृहखातं शिवसेनेला मिळालं तरच मी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारेन, अशी अट एकनाथ शिंदे यांनी घातल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. याबाबत आज एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे.
सातारा: विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यामध्ये महायुतीला मोठं यश मिळालं. मात्र, आता मंत्रीपद आणि मुख्यमंत्री या पदाचा पेच आता निर्माण झाल्याचं चित्र आहे. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला असला तरी देखील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही महत्त्वाच्या पदांची मागणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजप नेतृत्वाकडून त्यांना उपमुख्यमंत्रिपदासह इतर काही मंत्रिपदांचं आश्वासन देण्यात आल्याच्या चर्चा आहेत. मात्र, गृहखातं शिवसेनेला मिळालं तरच मी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारेन, अशी अट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घातल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. याबाबत आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाष्य केलं आहे.
दरेगावमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी तुम्ही गृहमंत्री, विधानसभा अध्यक्षपदाची मागणी केली आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, 'याबाबतची चर्चा महायुतीमध्ये होईल चर्चेतून बऱ्याचशा गोष्टी सुटतील आणि त्यामध्ये आम्हाला सर्वात महत्त्वाचं मतदारांनी महायुतीला निवडून दिलेलं आहे. त्या मतदारांना केलेल्या कमिटमेंट त्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने त्या पूर्ण करायच्या आहेत. मला काय मिळालं कोणाला काय मिळालं यापेक्षा जास्त जनतेला काय मिळणार आहे. महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला भरभरून मतदान केलेलं आहे. मतांचा वर्षाव केलाय. आता त्यांना आमच्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत
उपमुख्यमंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा?
उपमुख्यमंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा आहे, याबाबत बोलताना शिंदे म्हणाले, मोदीजी आणि अमित शाह जो निर्णय घेतील तो मला आणि शिवसेनेला मान्य असेल, याबाबत मी स्पष्ट केले आहे. गृह खात्याबाबत चर्चा होईल. लोकांना जी आश्वासन दिले आहेत ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. सर्वात महत्त्वाचं मला काय मिळालं दुसऱ्याला काय मिळालं हे महत्त्वाचं नसून जनतेला काय मिळणार आहे हे महत्त्वाचं आहे. उपमुख्यमंत्रिपद श्रीकांत शिंदेंना मिळणार अशा चर्चा आपण पत्रकारच चर्चा करत असता. या सर्व चर्चा आहेत. एक बैठक अमित भाई यांच्यासोबत झाली आहे. दुसरी बैठक आमची तिघांची होईल. त्यामधून महाराष्ट्राच्या हिताचा योग्य तो निर्णय होईल.
विरोधक काहीही बोलतात त्यांना काही काम राहिलेलं नाही. आमच्यामध्ये कोणताही समन्वयाचा अभाव नाही. विरोधकांना काही काम नाही अगदी विरोधी पक्षनेता देखील होता येत नाही. एवढं संख्याबळ आता त्यांचं कमी आहे. झारखंडमध्ये ते जिंकले त्यावेळी काही प्रॉब्लेम नव्हता. लोकसभेमध्ये ते जिंकले त्यावेळी काही प्रॉब्लेम नव्हता. लाडक्या बहिणींचा मोठा सहभाग या विजयामध्ये आहे. या भावांनी शेतकऱ्यांनी आम्हाला प्रेम दिलं या सर्वांच्या आशीर्वादामुळे ही निवडणूक आम्ही जिंकलो. फेरमत मोजणी बाबत निवडणूक निवडणूक आयोग निर्णय घेईल. जेव्हा तुम्ही हरता तेव्हा ईव्हीएम खराब आहे, जेव्हा जिंकता त्यावेळेस ईव्हीएम चांगला आहे, त्यांनी एकच भूमिका घेणे गरजेचे आहे, असंही शिंदे (Eknath Shinde) पुढे म्हणालेत.