Chhattisgarh Vidhan Sabha Election 2023: छत्तीसगढच्या 20 अन् मिझोरामच्या 40 विधानसभा जागांसाठी आज मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Chhattisgarh, Mizoram Assembly Election Voting: छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज 20 जागांवर मतदान होत आहे. या 20 जागांवर अनेक दिग्गजांचं भवितव्यही पणाला लागलं आहे. याशिवाय मिझोराममधील सर्व 40 जागांवरही आज मतदान होत आहे.
Chhattisgarh, Mizoram Assembly Election 2023: छत्तीसगड (Chhattisgarh) आणि मिझोराममध्ये (Mizoram) आज मतदान (Voting) होत आहे. एकीकडे छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh Vidhan Sabha Election 2023) पहिल्या टप्प्यात 20 जागांवर मतदान होणार आहे, तर दुसरीकडे मिझोरामच्या (Mizoram Vidhan Sabha Election 2023) सर्वच्या सर्व 40 जागांवर आजच मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये आज मतदान होत असलेल्या अनेक जागा नक्षलग्रस्त बस्तर विभागातील आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान यशस्वी करण्याची जबाबदारी 25,429 निवडणूक कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. तसेच, मतदानाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांमध्ये कडकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
छत्तीसगड, मोहला-मानपूर, अंतागड, भानुप्रतापपूर, कांकेर, केशकल, कोंडागाव, नारायणपूर, दंतेवाडा, विजापूर आणि कोंटा या 10 जागांवर सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान सुरू होईल. उर्वरित 10 जागांसाठी खैरागड, डोंगरगढ, राजनांदगाव, डोंगरगाव, खुज्जी, पंडारिया, कावर्धा, बस्तर, जगदलपूर आणि चित्रकोट या जागांसाठी मतदान सकाळी 8 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालेल. ज्या 20 जागांवर आज मतदान होणार आहे, त्यापैकी 19 जागांवर काँग्रेसचं वर्चस्व आहे. पोटनिवडणुकीत या 19 पैकी दोन जागा काँग्रेसनं आधीच जिंकल्या होत्या.
40 लाखांहून अधिक मतदार मतदान करणार
पहिल्या टप्प्यात 223 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ज्यापैकी 25 महिला उमेदवार आहेत. या टप्प्यात राज्यातील 40 लाख 78 हजार 681 मतदार मतदान करणार आहेत. यापैकी 19 लाख 93 हजार 937 पुरुष आणि 20 लाख 84 हजार 675 महिला आहेत. याव्यतिरिक्त 69 ट्रान्सजेंडरही मतदान करतील. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पहिल्या टप्प्यात 5,304 मतदान केंद्र तयार करण्यात आली आहे. 25 हजारांहून अधिक निवडणूक अधिकारी निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. या 5,304 मतदान केंद्रांपैकी 2,431 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगची सुविधा असेल.
हेलिकॉप्टरनं संवेदनशील भागात पाठवले
सुकमा, विजापूर, दंतेवाडा, कांकेर आणि नारायणपूर जिल्ह्यात 156 मतदान पक्ष हेलिकॉप्टरनं पाठवण्यात आली आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये 5148 मतदान पक्षांना बसनं पाठवण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलग्रस्त बस्तर विभागातील 12 विधानसभा मतदारसंघांमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) 40 हजारांसह एकूण 60 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या 20 जागांपैकी 12 जागा अनुसूचित जमातीसाठी आणि एक अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. सर्वाधिक उमेदवार (29) राजनांदगाव मतदारसंघात आहेत तर सर्वात कमी संख्या (7-7) चित्रकूट आणि दंतेवाडा मतदारसंघात आहेत.
'या' दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला
पहिल्या टप्प्यात सत्ताधारी पक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार दीपक बैज (चित्रकूट), मंत्री कावासी लखमा (कोंटा), मोहन मरकम (कोंडागाव), मोहम्मद अकबर (कवर्धा) आणि छविंद्र कर्मा (दंतेवाडा) हे उमेदवार आहेत. छविेंद्र हे काँग्रेसचे दिवंगत नेते महेंद्र कर्मा यांचे पुत्र आहेत. तसेच, भाजपकडून माजी मुख्यमंत्री रमणसिंह रिंगणात असून, ते राजनांदगावमधून खनिज विकास महामंडळाचे अध्यक्ष गिरीश दिवांगण यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. याशिवाय लता उसेंडी (कोंडागाव), विक्रम उसेंडी (अंटागड), केदार कश्यप (नारायणपूर) आणि महेश गगडा (विजापूर) या चार माजी मंत्र्यांनी निवडणूक लढवली आहे. या टप्प्यात माजी आयएएस अधिकारी नीलकंठ टेकम केशकलमधून निवडणूक लढवत आहेत. याशिवाय आम आदमी पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा कोमल हुपेंडी या भानुप्रतापपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यानं आमदार अनुप नाग हे अंतागढमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
गेल्या निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव
2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं या 20 पैकी 17 जागा जिंकल्या होत्या. त्याचवेळी भाजपनं दोन तर जनता काँग्रेस छत्तीसगडनं एक जागा जिंकली होती. 2018 ते 2023 या काँग्रेसच्या कार्यकाळात पक्षाला 90 पैकी 71 जागा मिळाल्या होत्या. गेल्या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपचा दारुण पराभव केला होता.
मिझोराममध्ये भाजप 23 जागांवर निवडणूक लढवणार
मिझोराममधील सर्व 40 जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मुख्यमंत्री झोरामथांगा यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी नॅशनल फ्रंट (एमएनएफ), झोराम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) आणि काँग्रेस यांच्यात येथे तिरंगी लढत होत आहे. भाजप 23 जागांवर निवडणूक लढवत आहे, जी आधी 39 जागांवर निवडणूक लढवत होती. याशिवाय आम आदमी पक्षाचे चार उमेदवारही रिंगणात आहेत. 'आप' राज्यात पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. याशिवाय 27 अपक्ष उमेदवारही निवडणूक लढवत आहेत.
2018 मध्ये मिझोराममध्ये 10 वर्षांनंतर गमावलेली काँग्रेसनं सत्ता
याआधी 2018 च्या विधानसभा निवडणुकीत मोठा उलटफेरा पाहायला मिळाला होता. 10 वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसचा पराभव झाला आणि मिझो नॅशनल फ्रंटनं बाजी मारली होती.