Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे अजूनही झोपी गेले आहेत, राज्यातील जनतेने धुवून काढलं तरी ते सुधारणार नाहीत : चंद्रशेखर बावनकुळे
कर्नाटक सरकारने विधानसभेतून सावरकर यांचा फोटो हटवून राहुल गांधीच्या भूमिकेला मूर्त रूप दिल आहे. उद्धव ठाकरे या विषयावर झोपी गेले आहेत का? असा सवाल करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोचरी टीका केली आहे.

Chandrashekhar Bawankule : कर्नाटक सरकारने विधानसभेतून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो हटवून राहुल गांधीच्या भूमिकेला मूर्त रूप दिल आहे. महानायकाला हटवून एकप्रकारे हे अतिशय निंदनीय कृत्य केल आहे. उद्धव ठाकरे या विषयावर झोपी गेले आहेत का? राज्यातील जनतेने धुवून काढलं तरी ते सुधारत नाहीत का? असा सवाल करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
बांगलादेशमधील हिंदू धर्मियांचे अध्यात्मिक गुरु चिन्मय कृष्णदास यांना बांगलादेश सरकारने अटक केली आहे. तसेच बांग्लादेशमध्ये अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू धर्मियांवर सातत्याने हल्ले होत आहेत. यामुळे बांगलादेशमधील हिंदूसह संपूर्ण जगभरातील हिंदू धर्मीय चिंतेत आहेत. दुसरीकडे याच मुद्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान त्यांच्या या टीकेलाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत टीका केली आहे. संजय राऊत हे ढोंगी आहेत. बांग्लादेशी बांधवांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहायला हवं. आम्ही संपूर्ण घटनाक्रमावर लक्ष ठेऊन आहोत. या प्रकरणी मोदीजी वेळीच योग्य नोंद घेतील. असेही बावनकुळे म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी साधे एक पत्र लिहिण्याची हिंमतही केली नाही
कर्नाटक विधानसभेतून सरकारने सावरकरांचा फोटो हटवून त्याठिकाणी राहुल गांधींच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या भूमिकेला मूर्त रुप दिले आहे. महाराष्ट्रात राहुल गांधी येतात, तेव्हा ते अशीच विरोधी भूमिका घेतात. हे निंदनीय कृत्य कर्नाटक सरकारने केले आहे. वारंवार अपमान होताना उद्धव ठाकरे झोपी गेले आहेत, त्यांनी का काँग्रेसचा निषेध केला नाही? उद्धव ठाकरे काँग्रेसच्या कळपातून बाहेर का पडत नाहीत? उबाठाला जनतेने धुऊन काढले आहे. उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या कुठल्याही भूमिकेला पुढे घेऊन जात नाही. किमान मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी किंवा राहुल गांधींना साधे एक पत्र लिहिण्याची हिंमतही त्यांनी केली नाही, अशी घणाघाती टीका ही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा समन्वय ठेवणारा दूसरा नेता नाही- चंद्रशेखर बावनकुळे
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यासारखा समन्वय ठेवणारा नेता दूसरा नाही. शिंदे, पवार, फडणवीस यांनी समन्वय साधून काम केले आहे. त्यांनी कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली आहे. मंत्री मंडळ विस्ताराचही ते तिघे समन्वय साधतील. महायुती घटक पक्ष सोबत आहेत. त्यांच्यासोबत देवेंद्रजी नक्कीच न्याय करतील असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेचे मंत्री मंडळ विस्ताराकडे लक्ष आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तो अधिकार आहे. लवकर तो निर्णय होईल. तसेच विदर्भातील अधिवेशनाआधी हा विस्तार होईल असेही ते म्हणाले.
ईव्हीएमने कधी त्यांना साथ दिली तर कधी आम्हाला- चंद्रशेखर बावनकुळे
दरम्यान, पुढील 3 महिन्यात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनता काँग्रेसचे पानिपत करेल. मारकडवाडीचे मी उदाहरण दिले आहे. ईव्हीएमने कधी त्यांना साथ दिली तर कधी आम्हाला. त्यांना साथ दिली तर काही बोलत नाही. आम्हाला साथ दिली तर ईव्हीएम मध्ये गडबड बोलतात. लोकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती पाहिजे आहे. ट्रिपल इंजिन सरकार काम करेल, केंद्र, राज्य व आता स्थानिक स्वराज्य संस्थांतही आम्ही चांगले काम करू, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

