Buldhana : प्रस्तावित उमेदवाराने ऐनवेळी पक्ष बदलला अन् शरद पवारांच्या शिलेदारानं मैदान मारलं; सिंदखेड राजाला मिळाला राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष
Buldhana Nagarpalika Election 2025 Result : राजमाता जिजाऊंचं माहेर असलेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजानगरीत चक्क राज्यातील सर्वात तरुण व कमी वयाचा नगराध्यक्ष निवडणुकीत विजयी झालाय.

Buldhana Nagarpalika Election 2025 Result : नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या शरद पवारांच्या (Sharad Pawar NCP) राष्ट्रवादीच्या प्रस्तावित उमेदवाराने ऐनवेळी पक्ष बदलला आणि वेळेवर एका नवख्या अन् 21 वर्षीय तरुणाला उमेदवारी देण्यात आली. विशेष म्हणजे या तरुणाने संधीचं सोनं करत इतिहासही घडवला. राजमाता जिजाऊंचं माहेर असलेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजानगरीत चक्क राज्यातील सर्वात तरुण व कमी वयाचा नगराध्यक्ष निवडणुकीत विजयी झालाय. सौरभ तायडे (Saurabh Tayade) असं या रसायनशास्त्र विषयात पदवीव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उच्चशिक्षित (M.sc. Chemistry ) तरुणाच नाव असून तो राज्यातील सर्वात तरुण व कमी वयाचा नगराध्यक्ष म्हणून निवडून आला आहे.
Sharad Pawar NCP : राज्यातील सर्वात ज्येष्ठ वयोवृद्ध नेत्यानं संधी दिली अन् राज्यातील सर्वात कमी वयाचा नगराध्यक्ष विजयी
राज्यातील सर्वात ज्येष्ठ व वयोवृद्ध अध्यक्ष व नेते असलेल्या शरद पवारांच्या पक्षाने सौरभ तायडेवर विश्वास ठेवून त्याला उमेदवारी दिली आणि एक इतिहासच घडवला. ऐतिहासिक व पुरातन असलेल्या सिंदखेडराजा नगरीचा प्रथम नागरिक बनल्यानंतर सौरभला आता सिंदखेड राजा शहराचा विकास करायचा आहे. विरोधात अनुभवी व धनाढ्य उमेदवार असूनही अतिशय आत्मविश्वासाने ही निवडणूक लढलो व जिंकलो, अशी भावना सौरभची आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत सिंदखेडराजा शहरात दोन्ही राष्ट्रवादीसह शिंदे यांची शिवसेना आमने-सामने होती. सिंदखेडराजा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा ही झाली होती. याउलट शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची कुठलीही सभा वा नेता प्रचाराला सिंदखेडराजा नगरीत आलेले नव्हते. मात्र तरीही सौरभ तायडे यांनी बाजी मारत एक इतिहास घडवला आहे.
राजमाता जिजाऊंच्या माहेरी मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीत लोकशाहीची अशीही कमाल
विशेष म्हणजे शिक्षण घेत असलेल्या सौरभ तायडेची परवा शिक्षणशास्त्र पदयुत्तर परीक्षा (B. ed) आहे. सिंदखेडराजा नगरीत तरुणांसाठी विशेष कार्य करायचंय, अशी भावना सौरभ तायडेची आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीत राज्यातील सर्वात कमी वयाचे तरुण नगराध्यक्ष सौरभ तायडे यांच्या या यशाने राज्यातील उच्चशिक्षित तरुणांनीही राजकारणात येऊन देशसेवा आणि राज्याचा राज्याचा विकास करावा, अशी लोकभावना आता समाजातून उमटत आहे.
ही बातमी वाचा:





















