BMC Election : ठाकरेंची सेना आणि शिंदेंची सेना 69 जागांवर आमने-सामने, 97 ठिकाणी भाजप-ठाकरे भिडणार; मुंबईतील हायव्होल्टेज लढती स्पष्ट
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde BJP Fights : भाजप आणि मनसे 35 जागांवर आमनेसामने आले आहेत, तर शिंदेंच्या शिवसेनेची फक्त 18 जागांवर मनसेविरुद्ध लढत होणार आहे.

मुंबई : राज्याचं नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या हायव्होल्टेज लढती (BMC High Voltage Fights) स्पष्ट झाल्या आहेत. मुंबईत 69 जागांवर ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी थेट लढत रंगणार आहे. त्याचवेळी भाजप आणि ठाकरेंची शिवसेना 97 जागांवर एकमेकांशी भिडणार आहे. तर मनसे आणि शिंदेंची शिवसेना फक्त 18 जागांवर आमने-सामने येणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक ही चांगलीच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
ठाकरेंची शिवसेना मुंबईत 163 जागांवर निवडणूक लढत आहे, तर मनसे 53 जागांवर निवडणूक लढत आहे. त्याचसोबत शरद पवारांची राष्ट्रवादी ही 11 जागांवर निवडणूक लढणार आहे. दुसरीकडे महायुतीतून भाजप 137 जागांवर तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 92 जागांवर निवडणूक लढत आहे.
Mumbai BMC Election : मुंबईतील समीकरण बदललं
राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुका होणार असल्या तरी संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय ते मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर. मुंबईत गेल्या 25 वर्षांपासून ठाकरेंची सत्ता राहिली आहे. मात्र, शिवसेनेत पडलेली फूट, भाजपाची वाढलेली ताकद आणि मुंबईत वाढलेली लोकसंख्या यामुळे समीकरण बदललं असून यंदाची निवडणूक चांगलीच अटीतटीची ठरण्याचं चित्र आहे.
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Fights : 69 जागांवर ठाकरे वि. शिंदे भिडणार
शुक्रवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर आता मुंबईतील हायव्होल्टेज लढतीही स्पष्ट झाल्या आहेत. त्यानुसार मुंबईतील 69 जागांवर शिंदे विरुद्ध ठाकरेंमध्ये थेट सामना रंगणार आहे. दुसरीकडे 97 जागांवर थेट भाजप आणि ठाकरेंची सेना यामध्ये लढत होईल.
MNS Vs BJP Fights : मनसे वि. भाजप 35 ठिकाणी लढणार
यासोबतच भाजप आणि मनसे 35 जागांवर आमनेसामने आले आहेत, तर शिंदेंच्या शिवसेनेची फक्त 18 जागांवर मनसेविरुद्ध लढत होणार आहे. या लढतींसह भाजप आणि शिेंदेंचा प्रत्येकी पाच जागांवर पवारांच्या राष्ट्रवादीशी सामना रंगणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढत आहे. त्यामुळे ही निवडणूक अधिकच रंगतदार होणार आहे.
Raj Thackeray On Election : राज ठाकरे करणार महायुतीचा पोलखोल
ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह राज्यात अनेक ठिकाणी भाजप, शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत आणि त्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. मात्र हे उमेदवार कसे निवडून आले याची पोलखोल राज ठाकरे हे होणाऱ्या सभांच्या माध्यमातून करणार आहेत. त्याचसंदर्भातले काही कॉल रेकॉर्ड्स, व्हिडीओ आणि अन्य महत्त्वाचे पुरावे मनसे नेत्यांनी राज ठाकरेंकडे सुपूर्द केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या महापालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवाराप्रकरणी मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे.
ही बातमी वाचा:




















