BMC Election 2026 VBA list: वंचित बहुजन आघाडी मुंबईतील 'या' 62 जागांवर लढणार, वाचा संपूर्ण वॉर्डांची यादी
BMC Election 2026 VBA list: काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी अधिकृतपणे आघाडी जाहीर करत जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आणला आहे.

BMC Election 2026 VBA list: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2025) पार्श्वभूमीवर मुंबईच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. काँग्रेस (Congress) आणि वंचित बहुजन आघाडी (VBA) यांनी अखेर अधिकृतपणे आघाडी जाहीर करत जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आणला आहे. या आघाडीअंतर्गत वंचित बहुजन आघाडी मुंबईतील 62 वॉर्डांमध्ये निवडणूक लढवणार असल्याची घोषणा रविवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम देत दोन्ही पक्षांनी मुंबईत एकत्र लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
BMC Election 2026: ही युती सत्तेसाठी नाही, विचारांसाठी : हर्षवर्धन सपकाळ
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, “भारिपसोबत आमची युती पूर्वीही होती. 1999 नंतर आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नव्हतो. तब्बल 25 वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत असल्याचा आनंद आहे. काँग्रेस आणि वंचित हे नैसर्गिक मित्र आहेत.” सपकाळ पुढे म्हणाले की, “ही आघाडी सत्तेसाठी नाही, तर विचारांसाठी आहे. हा आकड्यांचा खेळ नसून विचारांचा मेळ आहे. जागांपेक्षा विचारांना आम्ही प्राधान्य देत आहोत. आजपासून काँग्रेस आणि वंचित हे दोन मित्रपक्ष असून, मुंबई महापालिका निवडणूक आम्ही एकत्र लढणार आहोत,” अशी घोषणा त्यांनी केली.
BMC Election 2026: भाजपला रोखण्यासाठी रणनीती; वंचित 62 जागांवर लढणार
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी सांगितले की, “भाजपला रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ऑनलाइन बैठकीत या युतीला मान्यता दिली आहे. मुंबईतील 62 जागांवर वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढवणार आहे,” असे त्यांनी म्हटले.
BMC Election 2026 Congress: काँग्रेस किती जागांवर लढणार? अजूनही गुपित
दरम्यान, काँग्रेस मुंबईत नेमकी किती जागांवर लढणार, याबाबतचा आकडा अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहेत. काँग्रेसकडून शरद पवार गटाला केवळ 9 जागा सोडण्याची तयारी दाखवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अंतिम जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
BMC Election 2026 VBA list: वंचित बहुजन आघाडी मुंबईतील 'या' 62 जागांवर लढणार
वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या वॉर्ड क्रमांकांची यादी पुढीलप्रमाणे आहे.
6, 11, 12, 13, 14, 15, 19, 21, 24, 25, 27, 30, 38, 42, 53, 54, 56, 67, 68, 76, 80, 84, 85, 88, 95, 98, 107, 108, 111, 113, 114, 117, 118, 119, 121, 122, 123, 124, 127, 139, 146, 73, 153, 155, 157, 160, 164, 169, 173, 177, 182, 46, 193, 194, 195, 196, 197, 198, 199, 202, 207, 225.
आणखी वाचा




















