Parvati Constituency: पर्वती मतदासंघात माधुरी मिसाळांना पक्षातूनच आव्हान; श्रीनाथ भिमालेंनी महामंडळ नाकारलं; विधिमंडळाच्या निर्णयावर ठाम
Parvati Constituency: आक्रमक प्रवित्रा घेत मला महामंडळ नको विधिमंडळ हवंय असं म्हणत थेट पर्वती विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारीची मागणी श्रीनाथ भिमालेंनी केली आहे.
पुणे: विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजताच आता नाराजीनाट्य देखील सुरू झाल्याचं चित्र आहे. काही मतदारसंघांमध्ये पक्षांची चढाओढ लागली आहे, तर काही ठिकाणी एकाच पक्षातील नेत्यांमध्ये उमेदवारासाठी स्पर्धा सुरू असल्याचं चित्र आहे. पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपमध्येच उमेदवारीसाठी खडाजंगी सुरू असल्याचं दिसून येत आहे. भाजपचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांची राज्य कंत्राटी कामगार सल्लागार म्हणून निवड करून भाजपने त्यांच्या उमेदवारीला ब्रेक लावला. मात्र, त्यानंतर त्यांनी आक्रमक प्रवित्रा घेत मला महामंडळ नको विधिमंडळ हवंय असं म्हणत थेट पर्वती विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारीची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे आता पक्षातील नेत्यांची आणि पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढणार आहे.
मागील तीन टर्म या मतदार संघात भाजपच्या माधुरी मिसाळ या आमदार आहेत. मात्र, भाजपच्या श्रीनाथ भिमाले यांनीच माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांना भाजपच्याच गटबाजीला तोंड द्यावं लागणार आहे. 'मी महामंडळ मागितलं नाही, तर विधिमंडळ मागितलं असून मला माझ्या पक्षाकडून विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळेल.' असा ठाम विश्वास श्रीनाथ भिमाले यांनी व्यक्त केला आहे.
मला महामंडळ नको विधिमंडळ हवं आहे. विधानसभा निवडणूक लढवण्याच्या आणि जिंकण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे भिमाले यांनी स्पष्ट केल्याने आता मिसाळ यांच्या उमेदवारीसाठी अडचण होण्याची शक्यता आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीची जोरदार तयारी केलेले भाजपचे माजी विधानसभा नेते श्रीनाथ भिमाले यांना राज्य कंत्राटी कामगार सल्लागार मंडळ देण्यात आल्याची माहिती समोर आली, त्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला
पर्वती विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. माधुरी मिसाळ या भाजपकडून सलग तीन टर्म मतदारसंघाच्या आमदार राहिल्या आहेत. यावेळी त्यांच्यासमोर शरद पवार यांच्या पक्षाच्या अश्विनी कदम यांचं आव्हान असणार आहे. असं असलं तरीही अश्विनी कदम यांच्या पेक्षाही मोठं आव्हान माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांना पक्षांतर्गत असल्याचं बोललं जातं आहे. महापालिकेतील भाजपचे गटनेते श्रीनाथ भीमाले आणि भाजपचे नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी उमेदवारीसाठी मोठी फिल्डिंग लावलेली आहे. त्यामुळे आता महामंडळ नको विधिमंडळ हवं असं म्हणणाऱ्या श्रीनाथ भीमाले यांच्या मागणीवर पक्ष कोणता निर्णय देणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.