BJP : भाजप मविआला धक्का देणार, मिशन लोटस राबवणार? शरद पवारांच्या पक्षाचे खासदार संपर्कात, दरेकरांचा दुजोरा
BJP Mission Lotus : भाजप महाराष्ट्रात पुन्हा एकदा मिशन लोटस राबवण्याची शक्यता आहे. मविआचे खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केला आहे.
मुंबई : भाजप महाविकास आघाडीला लवकरच धक्का देण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे काही खासदार संपर्कात असल्याचा भाजपचा दावा आहे. काही खासदार राजीनामा देण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मविआच्या खासदारांमध्ये चलबिचल असल्याच्या चर्चा आहेत. मविआचे खासदार भाजप आणि इतर पक्षांच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार संपर्कात असल्याची माहिती भाजपच्या गोटातून समोर आली आहे.
राजीनामा देऊन पोटनिवडणुकीला सामोरं जाण्यासंदर्भात चर्चा पाहायला मिळत आहेत. लोकसभेला महाराष्ट्रात भाजपला यश मिळालं नव्हतं. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मिशल लोटस राबवलं जाणार असल्याच्या चर्चा आहेत.
प्रविण दरेकर काय म्हणाले?
भाजप नेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडीमधील खासदार आणि आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. महाविकास आघाडीचे खासदार ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी आहेत, विशेषत: शरद पवार साहेबांचे खासदार जिथं आहेत तिथं महायुतीचे आमदार निवडून आले आहेत. त्याचबरोबर विकास हाही त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. जर आपलं राजकीय भविष्य नीट व्हावं असं त्यांना वाटत असेल. केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार आहे. आपल्या मतदारसंघात विकासकामं करणं प्राधान्याचा विषय राहणार आहे. स्वत:चं राजकीय भविष्य, कार्यकर्त्यांचा आग्रह, ज्यासाठी निवडणूक लढवतो तो विकास अशी मानसिकता असेल तर यासाठी शरद पवार साहेबांचे खासदार अशी भूमिका घेऊ शकतात. आपल्याला विकास हवा असेल तर सत्तेच्या माध्यमातून गतीनं विकास करता येतो. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं भक्कम सरकार दोन्ही ठिकाणी आहे. त्यामुळं अशा प्रकारचा निर्णय होऊ शकतो. शरद पवार साहेबांचे असतील किंवा मविआचे खासदार आमच्या नेतृत्त्वाच्या संपर्कात राहण्याची शक्यता आहे, असं प्रविण दरेकर म्हणाले.
विद्या चव्हाण काय म्हणाल्या?
भाजपचं केंद्रातील सरकार नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या लंगड्या कुबड्यांवर उभं आहे. त्यांना कायम भीती आहे त्या कुबड्या कधीही गळून पडतील. त्यामुळं असे प्रयत्न सुरु आहेत. भाजपला नैतिकता नाही त्यामुळं असे प्रयत्न सुरु राहणार आहेत. इव्हीएमच्या जोरावर पुन्हा येईन म्हणणारे लोक आले आहेत. अनैतिक सरकारचे असे प्रयत्न चालू राहणार आहेत, असं विद्या चव्हाण म्हणाल्या. केंद्रातील सरकार मजबूत नाही त्यामुळं त्यांचे असे प्रयत्न सुरु राहतील. मात्र, त्यांना यश मिळणार नाही. आमचे खासदार ठाम राहतील, असं विद्या चव्हाण म्हणाल्या.
इतर बातम्या :