एक्स्प्लोर
प्रतिस्पर्ध्याला शून्य मतं पडल्यास 11 हजारांचं बक्षीस, भाजप नेत्यांचे बूथप्रमुखांना खुलेआम आमिष, व्हिडीओ व्हायरल
भाजप पदाधिकाऱ्याने बूथप्रमुखांना पैसे देण्याचे आमिष दाखवल्याचा प्रकार उल्हासनगर येथे उघडकीस आला आहे.

मुंबई : भाजप पदाधिकाऱ्याने बूथप्रमुखांना पैसे देण्याचे आमिष दाखवल्याचा प्रकार उल्हासनगर येथे उघडकीस आला आहे. जमनू पुरस्वानी असे या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव असून ते उल्हासनगर महापालिकेत भाजपचे सभागृह नेते आहेत. कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी काही दिवसांपूर्वी उल्हासनगरात मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात भाषण करताना जमनू पुरस्वानी यांनी बूथप्रमुखांना उद्देशून एक वादग्रस्त वक्तव्य केले. पुरस्वानी म्हणाले होते की, मतदानाच्या दिवशी तुमच्या बूथवर प्रतिस्पर्धी उमेदवाराला शून्य मतं पडली, तर तुम्हाला प्रत्येकी 11 हजार रुपयांचे बक्षीस देऊ. इतकेच नव्हे, तर पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते तुमचा सत्कार करु. पुरस्वानी यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मतदान आपल्या बाजूने करण्यासाठी अशा प्रकारे पैशांचे आमिष दाखवणे हे आचारसंहितेचे उल्लंघन असून याप्रकरणी पुरस्वानी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून मांडण्यात आली आहे. त्यामुळे पुरस्वानी हे अडचणीत येण्याची चिन्ह आहेत.
आणखी वाचा




















