Ajit Pawar: ''बटेंगे तो कटेंगे हे महाराष्ट्र सहन करणार नाही''; पुण्यातील सभेतून अजित पवारांचा हल्लाबोल, रोख कोणाकडे?
Ajit Pawar: ईडीपासून सुटका व्हावी यासाठी भाजपसोबत गेलो, असा दावा छगन भुजबळ यांनी केला, त्यावरती देखील अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा खुलासा केल्याच्या चर्चा झाल्या आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. ईडीपासून सुटका व्हावी यासाठी भाजपसोबत गेलो, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘2024: द इलेक्शन देंट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात हे नमूद केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर आता नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं आहे, त्यांनी अशी कोणती मुलाखत दिलेली नाही ज्यांनी छापली त्यांच्या विरोधात ते कोर्टात जाणार आहेत. त्याचबरोबर योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहेत, असं त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे. अलीकडच्या काळात निवडणुकीचा दिवस जसा जसा जवळ येत आहे तसे तसे महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवून काहीतरी नवीनच नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न चालला आहे. वास्तविक हा निवडणुकीचा मुद्दा नाही स्वतः भुजबळ याबाबत तसं काही बोललेले नाहीत. ते एक जबाबदार नेते आहेत. त्यांनी तातडीने याबाबत खुलासा केला आहे. पुढची कारवाई करण्याचे त्यांनी ठरवलेलं आहे. तुम्हाला एखादी बातमी मिळाली की, तुम्ही ती छापता जरी नकार दिला तरी त्याबाबत प्रश्न विचारता. हा मुद्दा महत्त्वाचा नाही. पाच वर्षाकरिता सत्ता कोणाच्या हातात द्यायची हा मोठा प्रश्न मतदारांच्या समोर आहे. असं असताना आम्ही आमची भूमिका मांडतोय ते त्यांची भूमिका मांडत आहेत,, आमच्या महायुतीचे वरिष्ठ पातळीवरील सर्व नेते वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहेत. हे सगळं चाललेलं आहे यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा निवडणुकीचा आहे असेही अजित पवार पुढे म्हणालेत.
भुजबळांनी त्या पुस्तकाबाबत किंवा केलेल्या दाव्याबाबत ताबडतोब सांगितलं आहे. मी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं त्यांनी त्याबाबत नकार दिला आहे. त्याबाबतच्या बातम्या आज पेपरला आलेल्या आहेत. सर्व चॅनलला न्यूज आहेत असे पुढे अजित पवारांनी म्हटलं आहे.
'बटेंगे तो कटेंगे'वर काय म्हणाले अजित पवार?
बटेंगे तो कटेंगे याबाबत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एक्स पोस्ट वरती बोलताना अजित पवार म्हणाले, मी महायुतीमध्ये एक घटक पक्ष आहे, आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रॅम वरती एकत्र आलेलो आहोत. विचारधारा भिन्न आहेत. पाठीमागच्या काळामध्ये अडीच वर्ष आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत सरकारमध्ये घालवले. त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि आमची विचारधारा वेगळी होती. परंतु त्यावेळी कॉमन मिनिमम प्रोग्राम वरती आम्ही एकत्रित आलेलो होतो. आता देशाचा विकास व्हावा राज्याचा विकास व्हावा या मुद्द्यावर आम्ही या सरकारमध्ये सामील झालेलो आहोत. पहिल्या दिवसापासून मी तुम्हाला सांगतो आहे, मी आजही शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेशी माझं मत निगडित आहे. आत्ताही आहे आणि पुढेही राहणार आहे. ही माझी भूमिका आहे, ही आमच्या पक्षाची भूमिका आहे असं अजित पवार म्हणालेत.
आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्र सहन करत नाही ते इतर राज्यांमध्ये कदाचित चालत असेल. ते इतर राज्याचे प्रमुख नेते आहेत भाजपचे प्रमुख नेते आहेत. एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत. विद्यमान मुख्यमंत्री आहेत. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. जर कोणी काही बोललं तर आम्ही त्यावर आमचं स्पष्ट मत मांडतो, आमची भूमिका स्पष्ट करतो ट्विट करतो. तुमच्या माध्यमातून सांगतो. तुमच्या माध्यमातून ते महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो असे पुढे अजित पवार म्हणालेत.