मोठी बातमी! मुंबईतील मतदान घोळाची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिवांना आदेश
मुंबईसह विविध मतदारसंघात 5 व्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेत अनेक मतदान केंद्रांवर मोठा घोळ झाल्याची ओरड झाली होती. मतदानाच्या दिवशी झालेल्या या ढिसाळ कारभाराची सरकारनं गंभीर दखल घेतली.
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या 5 व्या आणि राज्यातील शेवटच्या मुंबईसह 13 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडला. आत्तापर्यंतच्या सर्वच टप्प्यांच्या एकूण मतदानाची (Voting) टक्केवारी पाहिल्यास 5 व्या टप्प्यात सर्वात कमी मतदान झालं आहे. विशेषत: मुंबईतील अनेक मतदारसंघात मोठा घोळ झाल्याचं दिसून आलं. मतदार याद्यांमध्ये नाव नसल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला आहे. तर, मतदान प्रक्रिया अतिशय संथ गतीन राबवण्यात येत असल्याने मतदान केंद्राबाहेर रांगाच रांगा लागल्याचंही दिसून आलं. त्यामुळे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) संताप व्यक्त करत न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. आता, याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) दिले आहेत.
मुंबईसह विविध मतदारसंघात 5 व्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेत अनेक मतदान केंद्रांवर मोठा घोळ झाल्याची ओरड झाली होती. मतदानाच्या दिवशी झालेल्या या ढिसाळ कारभाराची सरकारनं गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. 20 मे रोजी झालेल्या 13 लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर ज्या ज्या ठिकाणी गैरसोय होती, मतदानाला विलंब लागत होता, ज्या लोकांना रुग्णालयात दाखल केलं गेलं आहे. या सर्व बाबींची आता होणार चौकशी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्य सचिव नितीन करी यांना तसे आदेश दिले आहेत. तसेच, मुख्य सचिवांनी तातडीनं याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करावी, असेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे, आता मुंबईतील मतदार याद्यांचा घोळ आणि गोंधळाच्या चौकशीसाठी विशेष समिती नेमूण तपास केला जाऊ शकतो.
मुंबईतील 6 मतदारसंघात 20 मे रोजी मतदान पार पडले. तर, भिवंडी, ठाणे, कल्याण लोकसभा मतदारसंघातही मतदान झाले. मात्र, मुंबईसह काही मतदारसंघात संथ गतीने मतदान झाल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. त्यानंतर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरेंच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना पराभव समोर दिसत असल्यानेच ते आरोप करत आहेत, असे म्हटले होते. मात्र, आता मुख्यमंत्री शिंदेंनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
रवींद्र वायकर व अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद
मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत आरे कॉलनी परिसरात मतदार केंद्रात निवडणूक अधिकारी आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याची पाहायला मिळाली. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचे कार्यकर्ते डमी ईव्हीएम मशीन घेऊन बसले आहेत, या संदर्भात माहिती घेण्यासाठी उमेदवार रवींद्र वायकर मतदार केंद्रात आले असता अधिकारी आणि रवींद्र वायकर यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती.
भिवंडीत कपिल पाटील भडकले
भिवंडी लोकसभा मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा आरोप करत गोंधळ पाहायला मिळाला. सकाळपासून शांततेत मतदान होत असताना सायंकाळी चारनंतर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याकडे बोगस मतदान होत असल्याची तक्रार आली. त्यानंतर कपिल पाटील हे थेट मतदान केंद्रावर धडकले व त्या ठिकाणी त्यांनी जोरदार राडा केला. एवढेच नव्हे तर मतदान केंद्रावर मतदातांना तसेच अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना दमदाटी व शिवीगाळ देखील केली. हा प्रकार शहरातील मिलत नगर, खंडू पाडा, बाला कंपाउंड परिसरात असलेल्या मतदान केंद्रावर झाल्याने, कपिल पाटील यांनी येथे भेट दिली होती.
ठाण्यातही बोगस मतदानाचा आरोप
दरम्यान, ठाणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनीही बोगस मतदान झाल्याचा आरोप केला आहे. ठाण्यात राजन विचारे विरुद्ध महायुतीचे नरेश म्हस्के यांच्यात थेट लढत आहे. तर, नरेश म्हस्केंच्या माध्यमातून ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.