Rajya Sabha Election 2022 : क्रॉस वोटिंगच्या भीतीने आमदारांची हॉटेलमध्ये व्यवस्था; एका दिवसाचा खर्च किती?
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्रॉस वोटिंगची किंवा मतं फुटण्याची भीती राजकीय पक्षांना आहे. त्यामुळेच सर्व पक्षांनी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे. आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा खर्चही जास्त आहे
मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या उत्कंठता वाढली आहे. 10 जून म्हणजे उद्या राज्यसभेची निवडणूक होणार आहे. राज्यातील सहा जागांसाठी मतदान पार पडले. सहाव्या जागेसाठी निवडणूक चुरशीची होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एक एक मत महत्त्वाचं आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्रॉस व्होटिंगची किंवा मतं फुटण्याची भीती सर्वच राजकीय पक्षांना आहे. शिवसेनेने आमदारांना व्हिप देखील जारी केला आहे. प्रत्येक पक्ष खबरदारी घेताना दिसत आहे. त्यामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपने आपापल्या आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवलं आहे. मात्र आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा खर्चही जास्त आहे.
जाणून घेऊया कोणत्या पक्षाने आपल्या आमदारांची कोणत्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली आणि त्याचा खर्च किती?
ट्रायडंट हॉटेलमध्ये एका रुमचं एका दिवसाचं भाडं 16 हजार रुपये
शिवसेनेचे आमदार मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये थांबले आहेत. शिवसेनेने या हॉटेलमध्ये 70 रुम बुक केल्या आहेत. ज्यात पक्षाच्या आमदारांसह अपक्ष आमदारांचाही समावेश आहे. आमदारांना या हॉटेलमध्ये ठेवण्याचा खर्चही तेवढाच जास्त आहे. ट्रायडंट हॉटेलमध्ये एका रुमचं एका दिवसाचं भाडं सुमारे 16 हजार रुपये आहे. म्हणजेच एक दिवसाचा खर्च 11 लाख 20 हजार रुपये आहे. पक्षाने चार दिवसांसाठी या हॉटेलमध्ये रुम बुक केल्या आहेत. म्हणजेच चार दिवसाचा खर्च जवळपास 44 लाख 80 हजार रुपये एवढा आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीने किती खर्च केला?
महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मित्रपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अशाचप्रकारे आपापल्या आमदारांना मुंबईतील रेनसान्स हॉटेलमध्ये ठेवलं आहे. या हॉटेलच्या रुमचं एका दिवसाचं भाडं सुमारे 16 हजार रुपये आहे. दोन्ही पक्षांनी जवळपास हॉटेलमधील 120 रुम बुक केल्या आहेत. तीन दिवसांचा खर्च 57 लाख 60 हजार रुपये आहे.
भाजपचे 120 आमदार हॉटेलमध्ये
तर विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आपल्या आमदारांच्या राहण्याची सोय ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये केली आहे. इथे राहण्यासाठी एका रुमचं एका दिवसाचं भाडं 14 हजार रुपयांच्या जवळपास आहे. भाजपने दोन दिवसांसाठी हॉटेलमधील 120 रुम बुक केले होते. यासाठी 33 लाख 60 हजार रुपयांचा खर्च आला आहे.