मुरजी पटेल अपक्ष लढणार का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
Andheri By Poll Election : मुरजी पटेल अपक्ष लढणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. अशातच
Andheri By Poll Election : अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीचं (Andheri By Poll) बिगुल वाजल्यापासूनच राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमयी घडामोडी पाहायला मिळाल्या. अशातच भाजपनं (BJP) या पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्रातचे प्रभारी सी. टी. रवी यांच्यासोबतच्या बैठकीनंतर भाजपच्या गोटात जोरदार हालचाली दिसून आल्या. त्यानंतर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजप पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. पण, या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरणारे उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) अपक्ष निवडणूक लढवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता पोटनिवडणुकीत आणखी काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या ऋतुजा लटके या निवडून याव्यात, त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ आम्ही अर्ज मागे घेतोय." तसेच, आमच्या महायुतीसोबत असलेल्या सर्वच पक्षांच्या वरिष्ठांशी बोलून आम्ही निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावेळी त्यांना मुरजी पटेल अपक्ष लढणार का? अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी बोलताना स्पष्ट केलं की, मुरजी पटेल अपक्ष निवडणूक लढणार नाहीत. भाजपचा उमेदवार कधीही पक्षाच्या निर्णयाविरोधात जात नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, अंधेरी पोटनिवडणूक अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली होती. अशातच काल अचानकल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. या पत्राबाबत बोलताना वरिष्ठ आणि आमच्यासोबत युतीत असलेल्या पक्षांशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली होती. तेव्हापासूनच भाजपच्या गोटात मोठ्या हालचाली दिसत होत्या. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये भेटीगाठी आणि बैठका पार पडल्या. त्यानंतर भाजपनं निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली.
भाजपची माघार, पण अजुनही पोटनिवडणूक बिनविरोध नाही
भाजपनं निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली असली तरी अद्याप निवडणूक बिनविरोध झालेली नाही. कारण मुरजी पटेल यांच्याव्यतिरिक्त इतर अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. जरी मुरजी पटेल माघार घेणार असले तरी इतर उमेदवारांनी मात्र अद्याप माघार घेतलेली नाही. अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत मुख्य लढ ही भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांत होणार होती. याव्यतिरिक्त इतर बारा जणांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता भाजपपाठोपाठ इतर पक्षही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माघार घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :