Navneet Rana : नवनीत राणा भाजपच्या चिन्हावर लढल्या तर ठिक, नाहीतर बघू...; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सूचक इशारा
Chandrashekhar Bawankule : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस बसावे ही सर्वाची इच्छा असून त्यामध्ये काही गैर नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय.
अमरावती : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी 2024 सालची निवडणूक ही भाजपच्या कमळ या चिन्हावर लढावी, त्यांनी तसं नाही केलं तर मग आम्ही वेगळा विचार करू असं सूचक वक्तव्य भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे आज अमरावती दौऱ्यावर असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आता बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा काय भूमिका घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जर नवनीत राणा यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक कमळावर नाही लढवली तर तो त्यांचा निर्णय आहे. मग आम्ही वेगळा विचार करू. आमची सगळ्यांची भावना आहे की नवनीत राणा यांनी कमळ चिन्हावर 2024 ची लोकसभा निवडणूक लढवावी. आम्ही त्यांना विनंती करू. पण त्यांचा एनडीएमध्ये सहभाग असल्याने याबाबत केंद्रीय पार्लमेट्री बोर्ड निर्णय घेईल.
खासदार नवनीत राणा यांनी जर त्यांच्या स्वाभिमानी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ असं बावनकुळे म्हणाले. अमरावतीचा खासदार हा भाजपचाच व्हावा अशी लोकांची मानसिकता असल्याचंही ते म्हणाले.
युवा स्वाभिमानी पक्षाच्या नवनीत राणा यांनी 2019 सालची निवडणूक ही अपक्ष म्हणून लढवली होती आणि जिंकली होती. त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता. गेल्या दोन निवडणुकीवेळी नवनीत राणा यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळाला होता. त्या जोरावर त्यांनी दोनदा निवडणूक लढली.
मधल्या काळात राजकारणाच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आणि खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी भाजपची कास धरली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमध्ये आमदार रवी राणा यांचा समावेश झाला. त्यामुळे अमरावतीमध्ये त्यांची ताकद वाढली.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर राणा दाम्पत्याने थेट उद्धव ठाकरेंशी पंगा घेतला आणि उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून चांगलंच घेरलं. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर त्यांनी हनुमान चालिसा पठण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना 14 दिवस तुरुंगात जावं लागलं होतं. तुरुंगातून आल्यानंतरही त्यांनी शिवसेनेला त्यांचा विरोध कायम ठेवला.
अमरावतीचा खासदार हा भाजपचा असावा असा प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून केला जात आहे. त्यासाठी भाजपने व्यवस्थितरित्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही आपले कार्य वाढवले आहे. त्यामुळे या ठिकाणी आता भाजपला पुरक वातावरण निर्माण झालं असून या जागेवर आता भाजपचे लक्ष आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवनीत राणा यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी नाहीतर त्या ठिकाणी वेगळा विचार केला जाईल असं भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनीच सांगितलं आहे.
अमरावतीच्या अंबादेवीत चंद्रशेखर बावनकुळे यांची महाआरती
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अमरावती शहरात 'घर घर चलो अभियाना'ची सुरूवात केली. अमरावती शहरातील कुलदैवत माता अंबादेवीसमोर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नतमस्तक झाले. त्यांनी अंबादेवी आणि एकविरा देवीची महाआरती केली. यावेळी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
ही बातमी वाचा: