अजित पवार म्हणाले 1 लाख मताधिक्यांनी निवडून येणार; आता, युगेंद्र अन् रोहित पवारांचा पलटवार
विधानसभा निवडणुकीत 175 हून अधिक जागांवर महायुतीचा विजय होईल आणि बारामती विधानसभा मतदारसंघातून मी लाखांहून अधिक मतांनी जिंकणार, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
पुणे : राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा उमेदवर विजयी होणार, यापेक्षा कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, येथील मतदारसंघात यंदा थेट पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे. महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर, महाविकास आघाडीकडून त्यांचे सख्खे पुतणे असलेल्या युगेंद्र पवार यांचेच त्यांना आव्हान आहे. त्यामुळे, येथील जनता कोणाच्या पाठीशी उभे राहणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. अजित पवार (Ajit pawar) प्रचारासाठी बारामतीत तळ ठोकून आहेत, तर युगेंद्र पवारांसाठी (Yugendra pawar)आजोबा शरद पवारांनी बारामतीत ठाण मांडल्याचं दिसून आलं. मात्र, बारामतीकर माझ्याच पाठीशी उभे राहतील, मी 1 लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन विजयी होईल, असा विश्वास अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.
विधानसभा निवडणुकीत 175 हून अधिक जागांवर महायुतीचा विजय होईल आणि बारामती विधानसभा मतदारसंघातून मी लाखांहून अधिक मतांनी जिंकणार, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. आता, अजित पवारांच्या या विश्वासावर आता त्यांचे प्रतिस्पर्धी युगेंद्र पवार आणि पुतण्या रोहित पवार यांनी पलटवार केला आहे. आम्ही सगळेच राजकारणात राहणार आहोत, पण 23 तारखेपर्यंत आपल्याला थांबावं लागेल, असे रोहित पवार यांनी म्हटले. तसेच, आमच्या 167 ते 180 च्या आसपास जागा येतील, परंतु नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी सभा घेतल्या तर आणखी 20 आमदार वाढतील, असा टोला रोहित पवारांनी भाजपच्या बड्या नेत्यांना लगावला. त्यांच्या तोंडातून महाराष्ट्राबाबत सकारात्मक शब्द जात नाही, हे लोकांना आवडत नाही. जिथे भाषण करता तिथे द्वेष पसरवतात, ही संतांची भूमी आहे, येथील लोकांना आवडत नाही. यंदाच्या निवडणुकीत आम्ही टार्गेट 288 ठेवले, त्यांनी टार्गेट 175 ठेवले त्यामुळे 120 च्या आसपास ते कसं तरी पोहोचतील. 23 तारखेला गुलाल हा विकासाकडेच असेल बारामतीत महाविकास आघाडीच निवडून येईल, असे रोहित पवार यांनी म्हटले. तर, युगेंद्र पवार यांनीही 23 तारखेला पाहू, असे म्हटले आहे.
1 लाख मताधिक्यावर युगेंद्र पवारांचा टोला
बारामती तालुक्यात चांगला उत्साह आहे, आज रोहित दादांसोबत प्रचार करत आहोत. विकास ही एक व्यक्ती कुठली करत नसते, तो विकासात सर्वांगीण असतो. त्याच्यामध्ये दादांचं, साहेबांचं, ताईंचं रोहित दादांचं या सगळ्यांचे योगदान आहे, असे युगेंद्र पवार यांनी म्हटलं. तसेच, पवार साहेबांसोबत सर्वसामान्य जनता आहे, त्यामुळे विजयाचा विश्वास वाटतो. लोकसभेचे वातावरण टिकून आहे. अजित दादांनी एक लाखांच्या मताधिक्याचं वक्तव्य केलं आहे, तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, 23 तारखेला कळेल, असा पलटवार युगेद्र पवार यांनी अजित पवारांच्या विधानावर केलाय.
170 पेक्षा जास्त आमदार मविआचे येतील - रोहित पवार
युगेंद्र माझ्यापेक्षा जास्त शिकला आहे. आमची तालीम एकच आहे, वस्ताद एकच आहे. युगेंद्रला बारामतीमधील अडचणी माहीत आहेत, आता त्या सोडवण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेल्याबद्दल एकही भाजप नेता बोलला नाही. अमित शहा यांना एकानेही विचारलं नाही. योगी आले होते. त्यांच्या सभा खूप मोठ्या असतात. खुर्च्या जास्त लावायच्या आणि कमी माणसे येतात. अमित शाह यांनी लोकसभेमध्ये साहेबांना विचारलं होतं, दहा वर्षात तुम्ही काय केलं? लोकसभेला दाखवले की साहेबांनी काय केलं. कोल्हापूरला म्हणाले पुरावे द्या, 23 तारखेला पुरावा भेटेल. राज्यात आपले सरकार येईल, 170 पेक्षा जास्त आमदार आपले निवडून येतील, असा दावा रोहित पवार यांनी केला.
हेही वाचा
सदा सरवणकरांवर कोळीवाड्यातील लाडकी बहीण संतापली; दारातूनच परत पाठवलं, चांगलंच सुनावलं