राष्ट्रवादीत शेवटच्या क्षणापर्यंत माजी मंत्र्याकडून मंत्री पदासाठी लॉबिंग, पक्षातील दिग्गज देवगिरीवर अजित दादांच्या भेटीला
Mahayuti Govt Cabinet Expansion: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गोटातून एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. माजी मंत्र्याकडून मंत्री पदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लॉबिंग सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.
मुंबई : राज्यात महायुतीचं सरकार (Mahayuti Govt) स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार? कोणत्या पक्षाला किती आणि कोणती मंत्रीपदं मिळणार याची चर्चा सुरु आहे. येत्या 14 डिसेंबरला म्हणजे शनिवारी मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जातेय. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गोटातून एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. यात माजी मंत्र्याकडून मंत्री पदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लॉबिंग सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. यासाठी अजित पवार यांना भेटण्याठी माजी मंत्री हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील देवगिरी निवासस्थानी पोहोचले आहेत. तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील देवगिरी निवासस्थानी पोहोचले आहेत. या पूर्वी माजी मंत्री धर्मराव बाबा अत्राम हे अजित पवारांची भेट घेऊन देवगिरी निवासस्थानातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे आज सकाळपासूनच अजित पवारांना भेटण्यासाठी माजी मंत्र्यानी भेटी गाठीचे सत्र सुरू केल्याचे बघायला मिळाले आहे.
राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याकडून मंत्री पदासाठी लॉबिंग
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिमंडळ विस्तारात 8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे. यात आपलं मंत्रिपद सुरक्षित करण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून शेवटच्या क्षणापर्यंत लॉबिंग सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर बावनकुळे एकनाथ शिंदेंची भेट घेत आहेत.
दरम्यान, 14 डिसेंबरला होण्याऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील ही भेट महत्वाची मानली जात आहे. त्या अनुषंगाने भाजप ॲक्शन मोडवर आली आहे. मंत्रीमंडळ विस्ताराच्या संदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये महत्वाची चर्चा होण्याची शक्यता देखील वर्तवली जातेय.
शिवसेनेत खातेवाटपाची निश्चिती! नगरविकाससह मिळणार 'हे' खाते
शिवसेनेचे खाते वाटप पूर्ण झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेला नगरविकास खाते मिळणार असल्याचे सांगितलं जातंय. तर पर्यावरण ऐवजी पर्यटन खाते मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे 14 तारखेला शपथ विधी होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
जी खाती शिवसेनेला मिळाली त्या पैकी काही खात्याचे मंत्री कोण असणार हे देखील निश्चित झाले आहे. मात्र काही खात्यांचे मंत्री ठरणे अद्याप बाकी असल्याचे सांगण्यात आले आहे. कॅबिनेट प्रमाणेच राज्य मंत्री कोण असणार? हा देखील विचार सुरू असून त्यातून आता 0 एक दोन नावे अंतिम केली जाणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
भाजप जे सांगेल ते अजित पवार गटाला आणि शिंदे गटाला मान्य करावं लागेल, मंत्रीमंडळ विस्तारावरुन जयंत पाटलांचा टोला