(Source: ECI/ABP News/ABP Majha)
यूपीचे मुख्यमंत्री लवकरच माजी मुख्यमंत्री बनणार; योगींच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गर्जना
Aaditya Thackeray UP Rally : योगींच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गर्जना. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचा उत्तर प्रदेश दौरा.
Aaditya Thackeray UP Rally : शिवसेनेचे युवा नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा हा दौरा नियोजित करण्यात आला आहे. पहिल्यांदाच प्रचारासाठी ठाकरे कुटुंबीयांपैकी कोणीतरी थेट उत्तर प्रदेशात पोहोचलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याबरोबर आदित्य ठाकरेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोरखपूरमध्ये प्रचारसभा घेतली. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी थेट भाजपवरही निशाणा साधला आहे. देशात सध्या पाच राज्यांच्या निवडणुका आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना महाराष्ट्राबाहेर पक्ष विस्तार करण्याच्या प्रयत्नात असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, यानिमित्तानं आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना 2024 साठी तयारी करत असल्याचंही बोललं जात आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पाच राज्यांच्या निवडणुका आणि आगामी महापालिका निवडणुकांसाठी स्वतः प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. तसेच आगामी लोकसभा निवडणुका शिवसेना आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वात लढणार असल्याचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं होतं. त्याचीच तयारी आदित्य ठाकरेंकडून सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही आदित्य ठाकरे सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे.
आज आदित्य ठाकरेंनी उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बालेकिल्ल्यात प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर थेट निशाणा साधला. महाराष्ट्रात मागील सरकारच्या कार्यकाळात काही चुकीच्या गोष्टी घडल्या. त्या सरकारमध्ये भाजपसोबत असल्याचं दु:ख वाटत असल्याची कबुली महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिली. उत्तर प्रदेशमधील शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांनी सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारवरही टीका केली. सध्याचे मुख्यमंत्री हे निवडणुकीनंतर माजी मुख्यमंत्री होतील असा टोलाही त्यांनी लगावला.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेने आपले उमेदवार उतरवले आहेत. शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांनी गोरखपूरमध्ये सभा घेतली. या वेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, उत्तर प्रदेशमध्ये द्वेषाचे राजकारण नको. प्रत्येक वेळी इथे लोकांना भीती दाखवली जाते. मात्र, प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत घाबरायचं कशाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचा मोर्चा आला होता. या मोर्चाला बदनाम करण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्यांच्या हाती लाल झेंडे असल्याने त्यांना नक्षलवादीदेखील संबोधले. त्या सरकारमध्ये आम्ही होतो. त्याचे दु:ख वाटते. काही चुकीचे निर्णय घेण्यात आले होते, असंही आदित्य यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शिवसेनेचे युवा नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याबरोबर आदित्य ठाकरे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमध्ये आदित्य ठाकरेंची प्रचारसभा झाली. तसेच, डुमारियागंज आणि सोराव इथं त्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. याआधी आदित्य ठाकरे यांनी गोव्यातही प्रचारसभा घेतल्या होत्या. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनाही रिंगणात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे आज उत्तर प्रदेशात सभा घेणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Aaditya Thackeray In Uttar Pradesh : फडणवीस सरकारमध्ये असल्याचे दु:ख ; आदित्य ठाकरेंची कबुली
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha