Mumbai University Results: मुंबई विद्यापीठाचे निकाल कधी जाहीर होणार? प्रभारी कुलगुरुंनी दिली महत्त्वाची माहिती
Mumbai University: मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षांचे निकाल कधी लागणार असा प्रश्न उपस्थित होत असताना प्रभारी कुलगुरुंनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
Mumbai University Results: कोविड नंतर हिवाळी सत्रात प्रथमच मुंबई विद्यापीठाची पदवी व पदव्युत्तर परीक्षा ऑफलाईन पद्धतीने झाली आहे. मागील दोन वर्ष ऑनलाईनच्या माध्यमातून परीक्षा पार पडल्यामुळे ऑफलाईन परीक्षेमध्ये काही समस्येला तोंड द्यावे लागले. परंतु मागील काही दिवसात विद्यापीठ प्रशासनाने केलेल्या अनेक उपाययोजनेमुळे उन्हाळी सत्राचे निकाल वेळेवर जाहीर करण्यात येतील असे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी सांगितले.
कोविडमध्ये विद्यापीठाने शासनाच्या निर्देशानुसार ऑनलाईन परीक्षा घेतल्या. कोविडनंतर शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या हिवाळी सत्रात प्रथमच विद्यापीठाने सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. यामध्ये मनुष्यबळाची कमतरता, विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा संप व इतर कारणास्तव विद्यापीठाचे हिवाळी सत्राचे निकाल उशिराने लागले होते.
परंतु, मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाने गेल्या चार आठवड्यापासून हिवाळी सत्राच्या परीक्षेतील त्रुटी दूर करून उन्हाळी सत्राच्या परीक्षेचे आणि निकालाचे नियोजन केले गेले. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ.अजय भामरे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. प्रसाद कारंडे, कुलसचिव डॉ. सुनील भिरुड यांनी इतर सर्व घटकांच्या विविध बैठका घेऊन या निकालाचे नियोजन केले आहे.
महत्त्वाच्या कॉलेजचे प्राचार्य, महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यापीठातील प्राध्यापक यांचे सहकार्य घेऊन मूल्यांकन करण्याचे कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सुट्टीच्या काळात देखील प्राध्यापक मूल्यांकन करीत आहेत.
त्यामुळेच गेल्या काही दिवसात उन्हाळी सत्राचे 25 निकाल 30 दिवसाच्या आत जाहीर करण्यात आले आहेत.
तसेच कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांनी मागील एक महिना विद्यानगरी येथील परीक्षा विभागात प्रत्यक्ष बसून व दैनंदिन बैठका घेऊन विविध शाखेचे अधिष्ठाता, विविध परीक्षा विभागातील अधिकारी, सीसीएफमधील अधिकारी, कर्मचारीवर्ग यांना उन्हाळी सत्राच्या निकालाचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार उन्हाळी सत्राचे निकाल वेळेवर जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या महत्वाच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचे मूल्यांकन अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती मु्ंबई विद्यापीठाच्यावतीने देण्यात आली आहे.
उन्हाळी सत्राचे 25 निकाल जाहीर
मुंबई विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र 2022-23 या उन्हाळी सत्राच्या निकालास सुरुवात झाली आहे. आजपर्यंत 25 निकाल जाहीर झाले आहेत. सोमवार रात्रीपर्यंत एकाच दिवशी 13 निकाल जाहीर केले आहेत.
उन्हाळी सत्रातील द्वितीय वर्ष व अंतिम वर्ष फाईन आर्ट (स्कल्पचर), द्वितीय वर्ष व अंतिम वर्ष फाईन आर्ट (मेटल वर्क), द्वितीय वर्ष व अंतिम वर्ष फाईन आर्ट (सिरॅमिक्स), मास्टर ऑफ लायब्ररी सायन्स सत्र 1,2,3 आणि 4 , मास्टर ऑफ फाईन आर्ट (इंटेरीयर डेकोरेशन) भाग 1, मास्टर ऑफ फाईन आर्ट (स्कल्पचर) भाग 1, मास्टर ऑफ फाईन आर्ट (मेटल वर्क) भाग 1 असे 13 निकाल सोमवार रात्रीपर्यंत जाहीर करण्यात आले आहेत.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI