HSC Exam 2022 : ऑल द बेस्ट! दोन वर्षानंतर प्रथमच बारावीची ऑफलाईन परीक्षा, पेपरसाठी वाढीव वेळ
HSC Exam 2022 : आजपासून महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. एबीपी माझाकडून सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा!
HSC Exam 2022 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या बोर्ड (HSC Exam) परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. राज्यातील 9 हजार 635 परीक्षा केंद्रावर 14 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी बोर्डाकडून भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीनं घेतली जात आहे. या परीक्षेसाठी राज्यातून एकूण 14,85,826 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या राज्यात मुख्य आणि उपकेंद्र मिळून एकूण 9635 परीक्षा केंद्र असतील. आजचा पहिला पेपर इंग्रजी विषयाचा असणार आहे. यावर्षी खास पेपर लिहताना ऑनलाईन शिक्षणामुळे लिखाणाचा सराव नसल्यानं यावर्षी 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिट तर 40 ते 60 गुणांसाठी 15 मिनिटांची वेळ वाढवून देण्यात आली आहे. आजपासून सुरू होणारी बारावी बोर्ड परीक्षा 7 एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून परीक्षेच्या आयोजनासंदर्भातील सर्व तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षा देण्यासाठी एका हॉलमध्ये 25 विद्यार्थी, zig zag पद्धतीनं बसवण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीनं बारावी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक तयार करत असताना परीक्षेदरम्यान महत्त्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये अंतर ठेवण्यात आलं आहे.
परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा, या दृष्टीनं मंडळामार्फत संपूर्ण राज्यात भरारी पथके नेमण्यात आली आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या असून विशेष महिला भरारी पथक आणि काही विभागीय मंडळात विशेष मुख्य अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत मंडळाकडून विनंती करण्यात आली आहे.
कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेता ऑफलाइन पद्धतीनं आयोजित परीक्षांसाठी काही महत्त्वाच्या उपाय योजना करण्यात आलेले आहेत.
- नेहमीपेक्षा सुमारे पंधरा दिवस उशिराने परीक्षांचं आयोजन
- शाळा कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर परीक्षा केंद्र उपकेंद्र देण्यात आली आहेत
- 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे
- तोंडी परीक्षा अंतर्गत मूल्यमापन याबाबत
परीक्षा कालावधीत अशी वाजणार घंटा
आजपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षा दरम्यान राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षांच्या वेळेनुसार, सकाळी घंटा वाजवली जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका वाटपासाठी दोन टोल वाजवले जातील. त्यानंतर प्रश्नपत्रिका वाटप करण्यासाठी एक टोल वाजवला जाणार. पेपर सोडवायला सुरूवात करण्यासाठी दोन टोल वाजवले जातील आणि त्यानंतर पहिला तास संपल्यानंतर दोन टोल. दुसरा तास संपल्यानंतर दोन आणि तिसरा तास संपल्यानंतर दोन टोल जाणार आहेत आणि शेवटी दहा मिनिटे बाकी असताना एक टोल आणि लेखन समाप्तीसाठी शेवटचा टोल वाजवला जाणार आहे.
परीक्षा काळात प्रशासनाकडून मनाई आदेश
परीक्षेच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी परीक्षा केंद्रावर कलम 144 मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत . परीक्षा देणारे विद्यार्थी आणि इतर घटक परीक्षा केंद्र परिसरात उपद्रव करत असतात किंवा कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी परीक्षा केंद्राबाहेर आणि परिसरात व्यक्ती अधिकारी कर्मचाऱ्यांना वगळून दोन पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे परीक्षा केंद्र असलेल्या परिसरामध्ये झेरॉक्स सेंटर ध्वनिक्षेपक बंद राहणार आहेत. तसेच परीक्षा केंद्रामध्ये अनाधिकृत वाहनांना प्रतिबंध करण्यात आल्याचे आहे सूचना प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- HSC Exam : NDA ची मुलाखत देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा, बोर्डाकडून 'एबीपी माझा' च्या बातमीची दखल
- HSC Board Exam : बारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये अंशतः बदल, मराठी आणि हिंदीचा पेपर पुढे ढकलला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI