Delhi Schools Re-opening: शाळांसोबत आता दिल्लीतील महाविद्यालयेही सुरु होणार, दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांची घोषणा
दिल्लीतील दहावी आणि बारावीच्या वर्गानंतर आता नववी आणि अकरावीचे वर्गही सुरु होणार आहेत. त्याचबरोबर महाविद्यालयेही सुरु करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे.
Delhi Schools Re-opening: दहावी बारावी नंतर आता नववी आणि अकरावीचे वर्गही सुरु करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. या संबंधीची घोषणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केली आहे. कोरोनामुळे गेली कित्येक महिने शाळा बंद होत्या. त्या काळात बहुतेक वर्ग हे ऑनलाईन सुरु होते.
शाळांसोबत दिल्लीतील महाविद्यालये, डिप्लोमा महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्था सुरु होणार असल्याचंही उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी स्पष्ट केलं. या संस्थांतील प्रॅक्टिकलचे वर्ग आणि काउन्सेलिंगचे वर्गही सुरु होतील.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की पुढच्या आठवड्यातील शुक्रवारपासून दिल्लीतील शाळेचे नववी आणि अकरावीचे वर्ग सुरु होतील. त्यादरम्यान सर्व शैक्षणिक संस्थांना कोरोनाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. कोरोनाचे संकट अजूनही पूर्णपणे संपलं नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांनी तसेच शाळेतील सर्व स्टाफनी आपल्या आरोग्याची काळजी घेत कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे निर्देश दिल्ली सरकारने दिले आहेत.
देशातील इतर भागातीतील नियमांप्रमाणे दिल्लीतील शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचा निर्णय आणि त्याला मान्यता ही पालकांना द्यावी लागणार आहे. त्या संबंधी पालकांचे लिखीत स्वरुपातील प्रतिज्ञापत्रक घेण्यात येणार आहे. त्यानंतरच संबंधित विद्यार्थ्याला शाळेत उपस्थित राहण्याची मंजुरी मिळणार आहे.
गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून दिल्लीतील शाळा बंद आहेत. आता बऱ्यात काळानंतर पुढच्या आठवड्यातील शुक्रवारपासून शाळा पुन्हा सुरु होत आहेत. त्यावेळी शैक्षणिक संस्थाना सुरक्षेचे सर्व नियम पाळणं बंधनकारक असेल. या संबंधी अंतिम प्लॅन काय असेल याची लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सांगितलं.
महाराष्ट्रातही पाचवी ते आठवीचे वर्ग 27 जानेवारीपासून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य हीच प्राथमिकता ठेऊन राज्यात तिसऱ्या टप्प्यातील पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शिक्षकांच्या आरटीपीसीआर तपासण्या झाल्या आहेत. पालकांनीही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना मास्क बांधूनच पाठवावे असे आवाहन करण्यात आले आहे. हा टप्पा यशस्वी झाल्यानंतर चौथी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा आम्ही विचार करु अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI