(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पाचवी ते आठवीपर्यंतचा टप्पा यशस्वी झाल्यानंतर चौथी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा विचार करू : वर्षा गायकवाड
शिक्षकांच्या आरटीपीसीआर तपासण्या झाल्या आहेत. तरी पालकांनीही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना मास्क बांधूनच पाठवावे, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.
परभणी : विद्यार्थ्यांचे आरोग्य हीच प्राथमिकता ठेऊन आम्ही तिसऱ्या टप्प्यातील पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु करत आहोत. शिक्षकांच्या आरटीपीसीआर तपासण्या झाल्या आहेत. पालकांनीही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना मास्क बांधूनच पाठवावे. विद्यार्थ्यांनी पुस्तके स्वतःची स्वतःच हाताळावी, पूर्ण काळजी घेऊन हे वर्ग सुरु करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. हा टप्पा यशस्वी झाल्यानंतर चौथी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा आम्ही विचार करू अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
राज्यात शालेय शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून कोरोनाच्या नियमावलीसह सुरु केल्या आणि यामध्ये सुदैवाने कोणताही वाईट अनुभव न आल्याने 22 हजार 204 शाळेत सध्या 22 लाख विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करताना राज्यातील 1 लाख 6 हजार 491 शाळेत 78 लाख 47 हजार विद्यार्थी शिकत आहेत. आता या शाळा सुरु झाल्यानंतर सोशल डिस्टन्स पाळत विद्यार्थ्यांना वर्गात बसवणे खरी डोकेदुखी ठरणार आहे.
सध्या प्रत्येक बाकावर झिगझॅग पद्धतीने मुलांना बसविण्याचे नियोजन केल्याचे मुख्याधिकारी दिलीप स्वामी सांगत असून गरजेनुसार पहिली ते चौथीचे मोकळे वर्ग देखील यासाठी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळेची घंटा वाजण्यापूर्वी गेल्या आठवड्यापासून या सर्व शाळांची सफाई व निर्जंतुकीकरणाची मोठी मोहीम हाती घेण्यात आली होती. यानंतर राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचण्याही जवळपास पूर्ण करण्यात आल्या असून शाळेत विद्यार्थी येण्यापूर्वी सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी झालेली असणार आहे. या मुलांना शास्त्र , गणित व इंग्रजी या तीन विषयाचे शिक्षण सुरु केले जाणार असल्याने विद्यार्थ्यांना मोजकेच दप्तर, नाकाला मास्क आणि स्वतःची पाण्याची बाटली घरून घेऊन यावी लागणार आहे.