Bhiwandi News : पळून जाऊन प्रेमविवाह केला, पण पोलिसांच्या ताब्यात असताना राजधानी एक्स्प्रेसमधून पडून मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
Bhiwandi News : पंचवीस वर्षीय युवकाचा पोलिसांच्या ताब्यात असताना रेल्वे अपघातात मृत्यू झाला. यानंतर युवकाच्या नातेवाईकांनी पोलिसांवर आरोप केले आहेत.
भिवंडी : तालुक्यातील पडघा पोलीस ठाणे (Padgha Police Station) हद्दीतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पंचवीस वर्षीय युवकाचा पोलिसांच्या ताब्यात असताना रेल्वे अपघातात (Railway Accident) मृत्यू झाला. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांवर आणि मुलीच्या घरच्यांवर मृत्यू प्रकरणी आरोप केले आहेत. अनिकेत जाधव (Aniket Jadhav) असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्यातील पाच्छापूर येथील अनिकेत जाधव व वाशिंद येथील नात्यातील अल्पवयीन मुलगी या दोघांमध्ये प्रेम होतं. प्रेमातून त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. ते अनेक दिवसांपासून मध्य प्रदेश या ठिकाणी असल्याची माहिती वाशिंद पोलिसांना मिळाली.
राजधानी एक्स्प्रेसमधून पडल्याने युवकाचा मृत्यू
त्यानंतर वाशिंद पोलिसांनी मध्य प्रदेशातील पोलिसांच्या मदतीने त्या दोघांना ताब्यात घेतले. अनिकेत व त्याची प्रेयसी यांना दोघांना मध्यप्रदेश येथून महाराष्ट्रात घेऊन येताना राजधानी एक्स्प्रेसमधून पडून अनिकेत याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू हा पोलिसांच्या ताब्यात असताना झाल्याने मुलाच्या नातेवाईकांनी अनिकेतचा मृत्यू मुलीच्या घरच्यांनी केल्या असल्याचा आरोप केला आहे.
सखोल चौकशी न झाल्यास आंदोलन छेडणार
पोलिसांच्या ताब्यात असताना सुद्धा अनिकेचा रेल्वे अपघातात मृत्यू होणे एक संशयास्पद असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी अनिकेच्या कुटुंबीयांनी केली आहे. अनिकेत ज्या दिवसापासून पळून गेला होता त्या दिवसापासून वाशिंद पोलिसांनी आम्हाला नाहक मानसिक त्रास दिल्या असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. याबाबत सखोल चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपाइंचे किरण चन्ने यांनी दिला आहे. तर या घटनेविषयी पोलिसांची प्रतिक्रिया विचारले असता पोलिसांनी बोलण्यास नकार दिला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या