कडाक्याचं भांडण झालं, नवऱ्याने बायकोच्या डोक्यात सिलेंडर घातला, पत्नीने जागेवर जीव सोडला, यवतमाळ हादरलं
Crime news:घटनेनंतर आरोपी विजय काही वेळासाठी घरातून पळून गेला होता, मात्र स्थानिक नागरिकांच्या माहितीवरून पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतलं आहे.

Yavatmal crime: राज्यभरात गुन्हेगारीनं कळस गाठलाय. दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, मारहाण, लैंगिक छळ, अत्याचार अशा कितीतरी घटना समोर येत असताना यवतमाळ एका धक्कादायक घटनेनं हादरलंय. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून तिची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. इंद्रकला विजय जयस्वाल (वय अंदाजे 38) असं मृत महिलेचं नाव असून, आरोपी पतीचं नाव विजय जयस्वाल आहे. कडाक्याचं भांडण विकोपाला गेल्यानं पतीने संतापाच्या भरात पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून तिची हत्या केली. या प्रकारामुळे संपूर्ण परिसर हादरलाय. (Crime News)
नेमकं प्रकरण काय?
प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून दांपत्यामध्ये सातत्याने वाद सुरू होते. विजय जयस्वाल आपल्या पत्नीवर सातत्याने संशय घेत होता. त्यामुळे दोघांमध्ये नेहमीच खटके उडत असत. अनेकदा हा वाद शाब्दिक चकमकीपर्यंत मर्यादित राहायचा, मात्र बुधवारी हा वाद इतका विकोपाला गेला की पतीनं डोक्यात सिलेंडर घालून पत्नीची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वादाच्या दरम्यान संतापलेल्या विजयने घरात असलेला गॅस सिलेंडर उचलून थेट इंद्रकला यांच्या डोक्यात जोरात घातला. हा धक्का एवढा जबरदस्त होता की इंद्रकला जागीच कोसळल्या. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी विजय काही वेळासाठी घरातून पळून गेला होता, मात्र स्थानिक नागरिकांच्या माहितीवरून पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतलं आहे.
ही संपूर्ण घटना इतकी धक्कादायक आहे की परिसरात याची चर्चा जोरात आहे. एकीकडे महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न गंभीर होत असताना, घराच्या चार भिंतीतच महिलांच्या जिवाला धोका निर्माण होतोय, असं बोललं जातंय. या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात विजय जयस्वालविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे.























